श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तू कोर्टात मुल्ला कटरच्या विरोधात साक्ष देवू नकोस, त्याने काहीच केले नाही, असे तू कोर्टात सांग, असे म्हणत महिलेला धमकाविले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्यासह एक जणावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे येथे राहणार्या महिलेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मुल्ला कटरच्या विरोधात मी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी सेशन कोर्ट, श्रीरामपूर येथे सुरू आहे. सदर केसच्या बाबतीत माझे श्रीरामपूर येथे जाणे-येणे असते.
साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी मी खाजगी कामासाठी श्रीरामपूर येथे आले होते. कामकाज आटोपून पुण्याला जाण्यासाठी निघाले असताना, बस स्टॅन्डकडे जाण्यासाठी मी नेवासा रोडचा बोगदा ओलांडून जात असताना, प्रकाश चित्ते माझ्या जवळ आले. मला त्यांनी थांबण्यास सांगितले.
ते मला म्हणाले की, तु मुल्ला कटरच्या विरुध्द साक्ष देवू नकोस, त्याने काहीच केले नाही, असे तू कोर्टात सांग. तो माझा कार्यकर्ता आहे. तु आमच्याप्रमाणे साक्ष दिली तर तुला दोन लाख रुपये देण्यात येईल. माझे ऐकले नाही, तर तुला कुठे संपवून टाकील ते कळणार नाही. तू पुढच्यावेळी श्रीरामपूरला आली की, मुल्ला कटरचा भाऊ तुला 50 हजार रुपये देईल. बाकी काम झाल्यावर भेटतील, असे म्हणुन ते निघून गेले. त्यानंतर घाबरुन मी पुण्याला निघून गेले. दि. 19 जुलै रोजी माझी साक्ष असल्याने दि. 15 जुलै रोजीच मी श्रीरामपूर येथे आले होते. सकाळीच मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी याने मला त्याच्या गाडीवर बसून श्रीरामपूर कोर्टात आणले.
तिथे एका वकीलाने माझे एका कोर्या कागदावर सही व अंगठे घेतले. त्यानंतर मी कोर्टापासून रिक्षात बसून श्रीरामपूर बस स्टॅन्ड येथे येत असताना रिजवान कुरेशी याने रिक्षा थांबवून तू माझ्या भावाविरुध्द साक्ष दिली, तर तुला मारुन टाकू, तु जर आमच्या बाजूने साक्ष दिली, तर आम्ही तुला 2 लाख रुपये देऊ, लगेच आता तुला 50 हजार रुपये देतो, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाजपाचे प्रकाश चित्ते, मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहीता 232, 126(2), 351(2), 49 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.




