सोलापूर । Solapur
सोलापूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. महापालिका निवडणूक होताच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे. या विधानामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले सुजात आंबेडकर एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी दावा केला की, प्रणिती शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय तडजोड (डील) झाली आहे. “प्रणिती शिंदे ऑक्टोबर महिन्यातच भाजपमध्ये जाणार होत्या, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत काँग्रेसमध्येच राहण्यास सांगितले आहे,” असा आरोप सुजात यांनी केला.
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील कथित ‘छुप्या युती’वर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “एकिकडे भाजप आहे आणि दुसरीकडे भाजपसाठी काम करणाऱ्या प्रणिती शिंदे आहेत. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने भाजपला सत्तेतून खाली खेचायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच तुमच्यासमोर एकमेव सक्षम पर्याय आहे. सोलापूरच्या खासदार काँग्रेसच्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात भाजपचे हित जोपासत आहेत, हे आता उघड झाले आहे.”
राजकीय नेत्यांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंधांवर भाष्य करताना सुजात आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या नातीच्या लग्नाचा संदर्भ दिला. “काही महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्या नातीच्या लग्नात शरद पवार, गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून एकत्र होते. हे नेते जनतेसमोर रस्त्यावर लढण्याचे नाटक करतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचे उद्योग, नातेसंबंध आणि धंदे एकच आहेत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
“काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपलाच मत देण्यासारखे आहे,” असे म्हणत सुजात यांनी मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसमध्ये राहून ‘सेटिंग’ करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीचे निकाल लागताच प्रणिती शिंदे अधिकृतपणे भाजपमध्ये दिसतील, असा पुनरुच्चार त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला.




