पुणे । प्रतिनिधी Pune
एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारताना जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. मंचर, पुणे; मूळ रा. सोनारी, ता. सिन्नर, नाशिक) यांना आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी मंचर येथे हा सापळा रचला.
याप्रकरणी ४८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे एका भागीदारी फर्ममध्ये भागीदार असून त्यांच्याकडे इमारतीच्या बांधकामाशी संबंधित सर्व शासकीय परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि पूर्णत्व प्रमाणपत्र मिळवण्याचे अधिकार आहेत. त्यांच्या फर्मने पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे ‘जॉइंट व्हेंचर’मध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर तक्रारदाराने ‘अंशतः पूर्णत्व दाखला’ मिळवण्यासाठी उपविभागीय अधिकारी (जुन्नर-आंबेगाव) यांच्याकडे अर्ज केला होता. हा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी नगररचना विभागाकडे पाठवून तिथून ना-हरकत प्रमाणपत्रही प्राप्त करून घेतले होते; मात्र त्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव स्वतःकडेच प्रलंबित ठेवला.
जेव्हा तक्रारदार प्रस्तावाच्या चौकशीसाठी गेले, तेव्हा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी हा दाखला देण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने व्यावसायिकाने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीनंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी दुपारी मंचर येथे सापळा रचला असता, ठरलेली रक्कम स्वीकारताना गोविंद शिंदे यांना आणि खैरनार यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





