मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे तत्कालीन महसूलमंत्री कर्मवीर भाऊसाहेब हिरे, विविध कॅबिनेट मंत्रिपदे भूषविणारे स्व. डॉ. बळीराम हिरे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या प्रसाद हिरे व त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे बोलतांना केले.
मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमा हिरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे त्यांच्या पत्नी गीतांजली हिरे, युवानेते प्रणवदादा हिरे, प्रांजली हिरे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आज (दि.15) पार पडला. यावेळी हिरे यांचा पक्षप्रवेशाबद्दल सत्कार करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरे व त्यांच्या समर्थकांचे पक्षप्रवेशामुळे भाजपला बळ मिळण्यासह जिल्ह्याच्या विकासाला देखील अधिक गती मिळणार असल्याचे सांगितले.
मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा आणि सर्वसामान्यांची कामे व्हावीत याच प्रामाणिक भावनेने देशातील सर्वात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पक्षात आज पुन्हा सहभागी होत आहे. आपण भाजपमध्ये कोणत्याही पदासाठी सहभागी झालेलो नसल्याचे प्रसाद हिरे यांनी पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले.
सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांची कामे व्हावीत, व्याघ्र संवर्धन आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन कार्यासाठी पाठबळ लाभावे, इतकीच आपली भावना आहे. लोकांची कामे करून त्या माध्यमातून जनसेवेसाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत. ही आपली घर वापसीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देत हिरे यांनी एका शब्दावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करण्यार्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रदेश मीडिया सेलप्रमुख नवनाथ बंग यांनी केले. यावेळी भाजप नेते महेश हिरे, आ. सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, नितीन पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, कमलेश निकम, माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार, दादा जाधव, भरत पोफळे, अरुण पाटील, श्याम गांगुर्डे आदी पदाधिकार्यांनी हिरे यांच्या पक्ष प्रवेशाचे यावेळी स्वागत करत त्यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांच्या आज (दि.15) भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी मालेगाव शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने वाहनातून कार्यकर्ते मुंबई भाजप कार्यालय येथे दाखल झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हिरे यांच्या नेतृत्वाखाली निनाद वैद्य, प्रथमेश पंडित, मयुरेश शेवाळे, देवेंद्रसिंग शेखी, बाजीराव निकम, मयूर निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, सतीश पाटील, समाधान हिरे आदींसह मोठ्या संख्येने समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.