Saturday, September 14, 2024
Homeनगरराहुरी बस आगाराचा प्रश्न कधी सुटणार ?

राहुरी बस आगाराचा प्रश्न कधी सुटणार ?

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

- Advertisement -

राहुरी शहर व तालुक्याची राहुरीच्या एसटी बसस्थानक व एसटी डेपोसाठी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

याबाबत सहा महिन्यांपूर्वी नगर येथील एसटी कार्यालयाच्या विभागीय अधिकार्‍यांशी चर्चा करून प्रश्न मांडला होता. अधिकार्‍यांनी त्यावेळी त्वरित याबाबतचा प्रस्ताव तयार करून मुंबई वरिष्ठ कार्यालयाला पाठवितो, असे आश्वासन दिले असताना अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव मुंबई कार्यालयात पोहोचला नसल्याचे समजते. ही अक्षम्य दिरंगाई असून याबाबत आता आंदोलन व इतर मार्गाने या अधिकार्‍यांना जाब विचारणार असल्याचा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.

तनपुरे म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश एसटी बस स्थानकाचे नुतनीकरण व इतर कामे पूर्णत्वास जात असताना उर्वरित दोन बसस्थानकांचीही कामे मार्गी लागल्याचे समजते. परंतु राहुरी बसस्थानकाचा प्रश्न चर्चा होऊन जवळपास सहा महिने झाले तरीही या स्थानकाचे घोडे नेमके कुठे अडले? याचा जाब आता अधिकार्‍यांना विचारण्याची वेळ आली आहे.

नगर व शिर्डीनंतर या रस्त्यावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे वर्दळ असणारे स्थानक म्हणून राहुरी प्रसिद्ध आहे. या बस स्थानकावरून शिर्डी व शिंगणापूरमुळे राज्य व परराज्यातील अनेक प्रवाशांची मोठी वाहतूक होते. राहुरी बसस्थानकाची इमारत साठ वर्षांपूर्वीची असून ही इमारत अत्यंत दयनीय झाली आहे. एसटी डेपो नसल्याने प्रवाशांची व इतरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर याबाबत त्वरेने हालचाल करून येथील अधिकार्‍यांची भेट घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लागण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी अधिकार्‍यांनीही त्वरित प्रस्ताव पाठविण्याचे मान्य करूनही आजपर्यंत प्रस्ताव न पाठविणारे अधिकारी अक्षम्य धूळफेक करीत असून याचा जाब विचारला जाईल.

बसस्थानकावरील उपहारगृह एकेकाळी राज्यात प्रसिद्ध होते. परंतु एसटीच्या हेकेखोर अधिकार्‍यांनी सुविधा न देता या उपहारगृहात प्रचंड भाडेवाढ केल्याने बर्‍याच दिवसांपासून बंद आहे. एसटीच्या विश्रामगृहाची दुरवस्था झालेली आहे. प्रवाशांना साध्या शुद्ध पाण्याची सुविधा येथे उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींना केवळ कामचुकार अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप तनपुरे यांनी केला आहे.

स्थानकावर पडलेले मोठ-मोठे खड्डे व झालेली दुरवस्था याबाबत त्वरित निर्णय घेऊन प्रस्ताव पाठवून जिल्ह्यातील इतर दोन स्थानकांच्याप्रमाणे त्वरित या स्थानकाचाही प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा एसटी अधिकार्‍यांविरुद्ध तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या