मुंबई | Mumbai
एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली. आज प्रताप सरनाईक यांनी परिवहन अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व कागदपत्रांवर सही करत आज अधिकृत रित्या अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारला आहे, त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती भाष्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजेत. आमच्या खात्याची फाइल ही वित्त खात्यातून पुन्हा पाठवली जाते, मात्र अजित पवार यांच्याकडे पोहोचवली जात नाही. त्यामुळे मंत्री म्हणून मी वित्त खात्यात ५ तारखेला जाऊन बसणार. आज दुपारीच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या एसटीला गतवैभव प्राप्त करून देणार अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली. आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
एसटी बसता प्रवास खडतर आहे पण चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. आता परिस्थिती चांगली नाही. पण, माझ्याकडे असलेल्या अनुभवातून येत्या दीड दोन वर्षात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. वेतनाचा प्रश्न काल तुमच्या माध्यमांतून पोहचला होता. ९०० कोटींची मागणी होत असताना केवळ २७२ कोटी मिळावे हे बरोबर नव्हते, ३० ते ५० हजारांचा पगार त्यांना असतो, भविष्य निर्वाह निधी वगैरे पण द्यायचा असतो, काल ही सर्व बाब समोर आली, काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो त्यांनी मग वित्त सचिवाची बोलून मंगळवार पर्यंत पगार होईल असे सांगितले आहे. आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत? असा सवाल देखील यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला आहे.
स्वारगेट सारखी घटना घडणार नाही
स्वारगेटसारखी घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि जीपीएस असणे गरजेचे आहे, येणाऱ्या ज्या बसेस आहेत, त्यात पण अशा सुविधा असायल्या हव्या, येणाऱ्या काळात महिलांच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था चांगल्या असतील, पार्सल सुविधा हाय टेक करू, जेणेकरून गावकरून मुंबईकडे येणाऱ्या पार्सल माध्यमातून उत्पन्न वाढवता येईल. प्रताप सरनाईक हे एकटे करू शकणार नाही सर्व अधिकाऱ्यांची साथ हवी तरच हे शक्य आहे, एसटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रताप सरनाईक पुढे जाणार.
सवलती बंद करणार नाही
एसटीतील सवलती बंद करण्याचा विचार नाही, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी ज्या सवलती सुरू केल्या त्या अजिबात बंद होणार नाहीत उलट त्यात वाढ होईल. श्रेयवादाची लढाई नाही, अजित पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे महामंडळ प्रॉफिटमध्ये नाही, यासाठी मी जो निर्णय घेईन त्यासाठी अजित पवारांचा सपोर्ट असेल.मी दादांची मुलाखत बघितली, ते असे काहीही म्हणाले नाहीत, फडणवीस मला म्हणाले की, तुम्हीच एसटी पुढे नेऊ शकता, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असेही पुढे सरनाईकांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा