Saturday, May 9, 2026
HomeनगरAshok Kharat Case : प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, भोंदू अशोक...

Ashok Kharat Case : प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी, ‘त्या’ खात्याचं गूढ उकलणार?

शिर्डी । Shirdi

महिलांचे शोषण आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीला आता मोठी गती मिळाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आज चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. एका पतसंस्थेतील वादग्रस्त १३२ संशयास्पद खात्यांच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

अशोक खरात याने पतसंस्थेत ‘नॉमिनी’ म्हणून नोंदणी केलेली एकूण १३२ खाती सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली की, या १३२ खात्यांपैकी चार खाती थेट प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. यामध्ये स्वतः प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन आणि त्यांच्या मुलांच्या नावावर दोन खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या या चार बँक खात्यांमधून आतापर्यंत तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम या खात्यांमध्ये कोठून आली, या पैशांचा मूळ स्रोत काय आहे आणि या व्यवहारांचे स्वरूप नेमके काय होते, या दिशेने शिर्डी पोलिसांनी आपला तपास चक्रावून सोडला आहे. भोंदू अशोक खरात आणि चाकणकर कुटुंबीयांच्या बँक खात्यांमधील या आर्थिक दुव्याचा शोध पोलीस घेत आहेत.

आज सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. तपास अधिकारी सध्या त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेत आहेत. मुख्य आरोपी अशोक खरात याच्याशी त्यांचे नेमके काय संबंध आहेत आणि या मोठ्या आर्थिक व्यवहारांमागे नक्की कोणाचा हात आहे, हे त्यांच्या जबाबानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या चौकशीमुळे खरात प्रकरणातील अनेक छुपे पैलू समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रुपाली चाकणकर यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या भगिनीची या प्रकरणात चौकशी होत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर पोलिसांना काय उत्तरे देतात आणि त्यातून तपासाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशोक खरात याने धर्माच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे हे जाळे नेमके किती खोलवर पसरले आहे, याचा उलगडा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar Crime : पहाटे जुगार अड्ड्यावर छापा; 29 जण पकडले

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी धाड टाकत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून...