Saturday, May 4, 2024
Homeनगरप्रवराच्या डाव्या, उजव्या कालव्यांना दूषित पाणी

प्रवराच्या डाव्या, उजव्या कालव्यांना दूषित पाणी

लोणी |वार्ताहर| Loni

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून सुरू असलेल्या रब्बीच्या आवर्तनात प्रवराच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यांना काळसर दूषित पाणी असल्याने गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिक,पशु-पक्षी आणि शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

(व्हिडिओ स्टोरी – दादासाहेब म्हस्के)

भंडारदरा धरणातून गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेतीसाठी रब्बीचे आवर्तन सुरू आहे. या धरणाला संगमनेर तालुक्यातील ओझर येथून उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. धरणापासून ओझरपर्यंत प्रवरा नदीतून पाणी येते.

दोन्ही कालव्यांतून अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो तर हजारो हेक्टर शेतीला याच कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी दिले जाते. उपसा सिंचन योजनांद्वारेही अनेक गावांतील शेतीला पाणी दिले जाते.

यावेळचे रब्बीचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कालव्यांमधील पाण्याचा रंग काळसर असल्याचे अनेक नागरिकांच्या लक्षात आले. मात्र सुरुवातीचे तीन दिवस पाणी गढूळच असते, असा नेहमीचा अनुभव असल्याने त्याकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही. मात्र आठ दिवस उलटूनही पाण्याचा काळसरपणा कमी होत नसल्याचे नागरिकांना याचे गांभीर्य जाणवू लागले. सर्वच गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावात हेच दूषित पाणी सोडण्यात आले.

हे पाणी पिल्याने अनेक गावातील नागरिकांना पोटाचा त्रास जाणवू लागला आहे तर अंगाला खाज येण्याच्या तक्रारीही सुरु झाल्या आहेत. लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पाटबंधारे विभागाने हे पाणी दूषित कशामुळे झाले याचा शोध तातडीने घेण्याची आवश्यकता आहे.

शेतीसाठी आवर्तन असल्याने शेतकरीही कालव्याचे पाणी पिकांना द्यावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे पाणी शेतीला देणे धोकादायक आहे. असे पाणी वारंवार शेतीला देण्यात आले तर शेतीची उत्पादकता कमी होऊन ती हळूहळू नापीक होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.तर आरोग्य विभागाने या पाण्यात नेमके कोणते घटक मिसळले आहेत याची तपासणी करण्याची गरज आहे. जर हे पाणी आरोग्याला धोकादायक असेल तर तशी माहिती ग्रामपंचायती व नागरिकांना वेळीच दिली पाहिजे.

पशुवैद्यकांच्या मते असे दूषित पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरू नये. या पाण्याने जनावरे धुवू नयेत. कालवे आणि चार्‍यांना पाणी असल्याने पक्षी आणि जंगली प्राणी ते पिऊ शकतात. त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या पाण्यात जर काही हानीकारक रासायनिक घटक असतील तर प्राणी, पक्षी व पाण्यात राहणारे मासे,सर्प,बेडूक आदींचा मृत्यूही होऊ शकतो.

पाटबंधारे विभागाचा बेजबाबदारपणा

प्रवराच्या दोन्ही कालव्यांना गेल्या दहा-बारा दिवसांपासून दूषित पाणी असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना याची माहिती नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकार्‍यांना खरंच याची माहिती नव्हती की माहीत असूनही त्यांनी दुर्लक्ष केले याचा खुलासा त्यांना करावा लागेल. हा त्यांचा बेजबाबदारपणा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. धरणातूनच दूषित पाणी येत आहे की धरणापासून ओझरपर्यंत प्रवरा नदीतून वाहताना हे पाणी दूषित झाले आहे याचे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागच करू शकतो. नदीपात्रात दूषित झाले असेल तर ते कशामुळे झाले ? त्यातून लाखो नागरिक,पशु-पक्षी आणि शेतीचे झालेले नुकसान त्यास जबाबदार असणारांकडून भरपाई करून देण्यात येईल का? अशा प्रश्नांची उत्तरे पाटबंधारे विभागाचे तातडीने द्यावीत आणि या दूषित पाण्याचे करायचे काय हेही सांगावे अशी नागरिकांची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या