Friday, May 3, 2024
Homeनगरमहालगावच्या प्रवरानदी पात्रात जीवघेणा बेसुमार वाळू उपसा सुरूच

महालगावच्या प्रवरानदी पात्रात जीवघेणा बेसुमार वाळू उपसा सुरूच

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातील महालगाव मालुंजे शिवारातील 21 दिवसांच्या परवान्याच्या नावाखाली जो वाळू उपसा सुरू आहे, त्या वाळूच्या उपशाचा दिलेला स्पॉट वेगळाच असून त्यापुढे साधारण एक किलोमीटर वर वाळू उपसा बेसुमारपणे सुरू आहे. शासकीय सर्व नियम धाब्यावर बसवून पोकलेनच्या साह्याने अहोरात्र दोन पोकलेन द्वारे वाळू डंपर मधून भरले जात असून यातून साडेतीन हजार ब्रास वाळू च्या नावाखाली सहा ते सात दिवसातच जवळपास पन्नास हजार ब्रास वाळू वाहिली गेल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

वाळू वाहतूक करताना नुकताच वाळूने भरलेला डंपर उलटून गरीब घरातील चालक ठार झाल्याची घटना घडली. वास्तविक पोकलेन वाळू उपसतांना एकाच जागी पंधरा-वीस फुटाचा खड्डा होऊन वाहतुकीसाठी तयार केलेला रस्ता खचून केवळ अविचाराने बेधुंद वाळूउपसा केल्यामुळेच सदर चालकाचा बळी गेला आहे. शासकीय नियमाप्रमाणे सूर्योदय ते सूर्यास्त वाळूचा उपसा करताना केवळ तीन फुटापर्यंत वाळू उपसा करण्याचा नियम असताना पहिल्या स्पॉटवर खडक लागेपर्यंत वाळू उपसली गेली आहे.

चारच दिवसात येथील वाळू संपल्याने नियोजित स्पॉट पेक्षा एक किलोमीटर पुढे वाळू उपशाला सुरुवात केलेली असताना निष्पाप तरुणाचा बळी त्यात गेला आहे. याबाबत महसूल पोलिस प्रशासन सोयीस्कर डोळेझाक करतानाच दिसत आहे. येथील शेती व शेतकर्‍यांचे भविष्य उजाड होत असल्याचे उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय प्रशासनापुढे काही करता येत नसल्याची भावना येथील शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मोठ्या डंपर मुळे रस्त्याची वाट लागली असून शेती पाण्याचा प्रश्न अजून बिकट होणार आहे, अशी भावना शेतकर्‍याचे कडून व्यक्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने त्वरित बेकायदेशीर नदीपात्रात वेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाचा पंचनामा करून वाळू वाहतूक बंद करावी व उजाड होत असलेल्या शेती व शेतकर्‍यांचे भवितव्य वाचवावे. तसेच संबंधितांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करीत आहेत.

वाळू वाहतूक ठिकाणी डंपर उलटून झालेल्या चालकाच्या मृत्यूबाबत योग्य ती चौकशी होऊन नेमका डंपर कसा घसरला? खोदकाम किती झाले होते? याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून मयत तरुणाच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी तसेच चालक मित्रांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या