Friday, May 29, 2026
Homeनगर18 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला

18 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgaon

- Advertisement -

राहुरी (Rahuri) तालुक्यातील रामपूर (Rampur) येथील प्रवरा नदीवरील (Pravara River) बंधार्‍याजवळ शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 14 वर्षीय दिनेश नितीन जाधव या मुलाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू (Death) झाला. तब्बल 18 तास चाललेल्या थरारक शोधमोहीमेनंतर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. या घटनेमुळे संपूर्ण प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोंधवणी येथील दिनेश हा उन्हाळी सुट्टीनिमित्त आई-वडील व लहान भावासह रामपूर फाटा येथे आजोबा इंद्रभान बोरुडे यांच्या घरी आला होता. शनिवारी दुपारी कुटुंबियांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दिनेशला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक वेगवान पाण्यात ओढला गेला. काही क्षणांतच तो कुटुंबीयांच्या नजरेआड झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत आरडाओरडा केला. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कोणालाही त्याच्यापर्यंत पोहोचता आले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

जिल्हा अग्निशमन कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर शिर्डी (Shirdi), राहाता (Rahata) व श्रीरामपूर (Shrirampur) नगरपालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आपदा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. नदीपात्रातील खोल पाणी, वाढता प्रवाह आणि अंधार यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. रात्रभर प्रयत्न सुरू ठेवूनही अंधारामुळे बचावकार्य थांबवावे लागले. रविवारी सकाळी पुन्हा बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर सकाळी अकराच्या सुमारास दिनेशचा मृतदेह सापडताच कुटुंबीयांचा आक्रोश उसळला. उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

या शोधमोहीमेत साईनंद भामरे, तेजस वाणी, शुभम साठे, ऋषिकेश सदाफळ, प्रशांत डांगे, अमोल बनसोडे, मुज्जू शेख, राहुल जाधव, रामराजे गायकवाड तसेच ईआरटी टीम संगमनेर आणि स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, या घटनेनंतर प्रवरा नदीवरील बंधार्‍याजवळ सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी, इशारा फलक आणि कायमस्वरूपी बचाव यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...