राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळूची अवैध उपसा करुन, वाहतूक करणार्या 7 आरोपींविरुध्द कारवाई करुन 28 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे सोमवार दि.23 जून 2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौणखनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना तालुक्यातील चिंचोली शिवारात प्रवरा नदीच्या पात्रामध्ये काही इसम अवैधरित्या विनापरवाना, बेकायदा, चोरुन वाळूचा उपसा करुन ती नदीपात्राचे बाहेर काढून ती चारचाकी वाहनांत व ट्रॅक्टरने भरुन तिची वाहतूक करत असतात. आता गेल्यास मिळून येतील, अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पथक व पंचांना समक्ष बोलावून कारवाई करण्यासाठी लागणार्या साहित्यासह शासकीय व खासगी वाहनाने नदीपात्रात गेले.
सदर ठिकाणी काही इसम ट्रॅक्टरला यारी जोडून यारीच्या सहाय्याने प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करुन ती वाळू दुसर्या एका ठिकाणी ट्रॅक्टर टेलर मध्ये वाहतूक करण्यासाठी भरत असल्याचे दिसले. त्याच वेळी पोलीस पथकाने छापा टाकला. पोलीस पथकाची चाहूल लागताच शंकर राजेंद्र भोसले (रा. पिंपळगाव फुणगी ता. राहुरी), शहादेव विठ्ठल माने (रा.लेंडी तलाव, मेहकर जिल्हा बुलढाणा हल्ली रा. चिंचोली ता. राहुरी), अभिषेक राजेंद्र नाचणे (रा. नवले वस्ती, बेलापूर) यांना वाहनासह पळून जाताना पोलीस पथकाने पाठलाग करुन पकडले. तसेच चिंचोली गावठाण येथे वाळूचा साठा केलेल्या ठिकाणी एक डंपर व एक हायवा असे दोन वाहने उभी होती व त्यामध्ये जे.सी.बी च्या साहाय्याने वाळू भरत होते. त्याच वेळी पोलीस पथकाची चाहूल लागताच डंपर वरील चालक डंपर तेथेच सोडून पळून गेला. मात्र जेसीबी व हायवा वरील चालक हे जेसीबी व हायवा सह तेथून पळून गेले. पकडलेल्या इसमांना पळून गेलेल्या इसमांची नावे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांची नावे गणपत गफले (रा. संक्रापूर ता. राहुरी), निखील बबल लाटे (रा. चिंचोली ता. राहुरी), संदीप लाटे (रा. चिंचोली ता. राहुरी) असे असल्याचे सांगून सदरचा हायवा दिपक बबन लाटे (रा. चिंचोली ता. राहुरी) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले.
या ठिकाणी 5 लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा यारी जोडलेला ट्रॅक्टर, 7 लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॉली जोडलेली असलेला व त्यामध्ये वाळू असलेला ट्रॅक्टर, 15 लाख रुपये किंमतीचा एक विना नंबरचा टाटा कंपनीचा डंपर तसेच 1 लाख 8 हजार रुपये किंमतीची प्रवरा नदीपात्रातून उत्खनन केलेल्या वाळूचा साठा अंदाजे 18 ब्रास असा एकूण 28 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला व मंडल अधिकारी अभिजीत खटावकर तसेच तलाठी अंबादास आरले, यांच्या ताब्यात पुढील कारवाई करीता दिला आहे. तसेच ताब्यात मिळून आलेले इसम व अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेली साधने ताब्यात घेतली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात 7 आरोपींवर गु.र.न. 701/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 (ई), 3 (5) सह पर्यावरण संरक्षण कायदा 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, राजेंद्र वाघ, शकील शेख, दिगंबर कारखिले, शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, संभाजी बोराडे, जालिंदर दहिफळे, ढाकणे, जाधव आदी पोलिसांच्या पथकाने केली आहे.




