Friday, September 20, 2024
Homeनाशिकदेशात प्रगतीसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना; नाशकात ईद-ए-मिलाद सण शांततेत

देशात प्रगतीसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना; नाशकात ईद-ए-मिलाद सण शांततेत

नाशिक | प्रतिनिधी
शहर परिसरातील मुस्लीम समाजाने आज (दि. १६) पवित्र ईद ए-मिलाद अर्थात पैगंबर साहेबांच्या जयंतीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने शांततेत साजरा केला. आज मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मुस्लीम बांधवांनी जुलूस काढण्याच्या वेळेत बदल करून सुमारे दोन तास अगोदर जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकात्मतेचा अनोखा संदेश जगाला देण्यात आला. आज जुलूसचे अनेक ठिकाणी स्वागत हिंदू बांधवांनी आवर्जुन केल्यामुळे नाशिकमधील हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श पाहायला मिळाला.

- Advertisement -

सुमारे ४० हजार भाविकांनी जुलुसमध्ये सामील होऊन देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना केली. मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष फातेहा पठण करीत एकमेकांना प्रसाद दिला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुलूसला चौक मंडई येथील जहांगीर मशीद समोरून सुरवात झाली. यावेळी नेतृत्व करणारे खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी खतीब यांच्यासह उलेमांनी देशाच्या प्रगतीसाठी शांततेसाठी बंधुभाव एकात्मता अबाधित राहावी, यासाठी विशेष प्रार्थना केली सुमारे नऊ तास अखंड मिरवणूक सुरू होती. पवित्र मिलाद‌निमित्त मागील दोन आठवड्यांपासून मुस्लीम बांधवांनी जय्यत तयारी सुरू केली होती.

शहरातील मुस्लीम बहुल भागासह महत्त्वाचे चौकांवर विशेष करून जुलूस मार्गावर प्रचंड सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून हिरवे, लाल झेडे लावण्यात आले होते. यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. जुलूसच्या अग्रभागी शहरातील विविध मशिदींचे र्इमाम तसेच मौलाना मंडळी चालत होते. त्यांच्या मागे भाविक पवित्र नात शरीफ, सलाती सलाम व इतर धार्मिक गीते पठण करीत मोठ्या आदबीने चालत होते.

सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती, मशिदी, धार्मिक स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मिरवणूक मार्गावरील सजावट पाहण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुस्लीम बांधवांसह महिलांनी गर्दी केली होती. आज सकाळी मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष फातेहा पठण करीत एकमेकाला प्रसाद दिला. दुपारी प्रथेप्रमाणे चौक मंडई येथून जुलूस ए मिलाद काढण्यात आले. हिंदू-मुस्लीम एकता जुलूसच्या सुरुवातीला खतीब -ए-नाशिक यांच्यासह नायब काजी ए, शहर एजाज काजी आदी उलेमांचे विविध मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. हिंदू नेते तसेच बांधवांनी मुस्लीम बांधवांचे स्वागत केल्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडले.

यावेळी खा. राजाभाऊ वाजे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माजी महापौर विनायक पांडे, मा. आमदार वसंत गीते, मा. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, मा. नगरसेवक गुलजार कोकणी, मा. नगरसेवक राहूल दिवे, मा. स्थायी समिती सभापती संजय चव्हाण, काँग्रेसचे जावेद इब्राहिम, अब्दुल बाचा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर काळे, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते तनवीर खान तांबोळी, मुस्ताक नेते आदी विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी तसेच सर्व धर्म उपस्थित होते.

यावेळी बोहरा समाजाच्या वतीने देखील मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. १६ ऑगस्ट रोजी जुने नाशिक परिसरात दोन समाजात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज मिलाद सण साजरा करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात विशेष करून मिरवणूक मार्गावर चोख पोलीस चंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गासह विविध ठिकाणी पोलिसांसह विविध मुस्लिम संस्थांचे पदाधिकारी गळ्यात ओळखपत्र घेऊन पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते.

लहान मुलांनी हातात झेंडे घेऊन मिरवणूक मार्गक्रमण केले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना सरबत, पाणी, खिर तसेच बिस्किटे, खजूर आदी खाद्यपदार्थचे वाटप करण्यात येत होते. मौलाना मंडळींचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. मुस्लीम बांधवांनी डोक्यावर इस्लामी टोपी परिधान केली होती तर पठानी सूट व अंगावर सुगंध लावला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सण साजरा करण्यात आला.

काजीपुरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक गजानन शेलार, बबलू शेलार आदींनी स्वागत केले. नानावली भागात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सलीम राज तसेच आदींनी स्वागत केले.

मोहल्यांच्या वतीने स्वागत

पैगंबर जयंती मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. कोणत्याही प्रकारे राजकारण यात नव्हते. शेकडे वर्षांची परंपरेनुसार अहले मोहल्ला या पद्धतीने नुसार फलक लावून विविध चौकांमध्ये मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक चौक मंडई, बागवानपुरा, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, अजमेरी चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदम शाह, काझिपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकी, दुध बाजार, पिंजार घाट या पारंपारिक मार्ग वरून बडी दर्गा शरीफ येथे दाखल झाली. या ठिकाणी इस्लामी पद्धतीने समारोप करण्यात आले.दरम्यान वडाळा गावासह काही ठिकाणी स्वतंत्र जुलूस काढण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या