अडनिड्या वयातील एका खेळाडूने असीम जिद्दीचा आणि धैर्याचा परिचय देशाला नव्याने पुन्हा एकदा नुकताच करून दिला. प्रीती सुरेश निकुंभ हे तिचे नाव. ती किक बॉक्सिंग खेळते. १७ वर्षांखालील गटात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्यासाठी ती डेहराडूनला गेली होती.
स्पर्धेच्या आधल्या दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाल्याचा निरोप तिच्यापर्यंत पोहोचवला गेला. असा निरोप मिळताच ती व्यक्ती कोलमडून पडणे अगदी स्वाभाविक. तसेच घडले. तथापि तिच्या प्रशिक्षकांनी तिला सावरले. तिच्या वडिलांच्या स्वप्नाची आठवण करून दिली. या स्पर्धेत तिने पदक जिंकावे हे स्वप्न तिच्या वडिलांनी पाहिले होते. असामान्य धैर्य दाखवत प्रीतीने सुवर्णपदक पटकावले. तिचे आणि तिच्या प्रशिक्षिकांचे कौतूक करायलाच हवे. तिच्या कृतीतून तिच्या पालकांची सुजाण मानसिकता दिसून येते. प्रीती अजाणत्या वयाची आहे. या वयोगटातील मुलांची मनस्थिती संवेदनशील असते. मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्याशा गोष्टी सुद्धा त्यांच्या मनात वादळ निर्माण करू शकतात. त्यांना एककल्ली बनवू शकतात. या वयाची मुले ऐकत नाहीत, दुरुत्तरे करतात, त्यांचेच म्हणणे खरे करतात अशी पालकांची तक्रार आढळते. त्याच वयात तिने दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
या वयाची मुले सुजाण घडवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. याच वयात मुलांमध्ये मूल्ये रुजवावी लागतात. त्यासाठी अडनिड्या वयातील मुलांशी त्यांच्या पालकांचा मनमोकळा संवाद असायला हवा. त्यांनी तो तसा राखायला हवा. मुलांसाठी जाणीवपूर्वक वेळ काढायला हवा. प्रीतीच्या पालकांनी तो तसा नक्की काढला असावा. कदाचित त्यामुळेच वडील गमावल्याचे दुःख प्रीती पेलू शकली. तिने आणि तिच्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाचा पाठलाग करू शकली. तिच्या खेळाचाही तिला घडवण्यात मोठाच वाटा असणार. मुलांचा सर्वांगीण विकास होण्याला खेळ मदत करतात. खेळामुळे मुलांची मानसिकता सकारात्मक बनते. संकटाचा आणि आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित होते. मैदानी खेळांमुळे शरीराचा आणि मनाचा व्यायाम होतो. निरोशी शरीराबरोबर मनही निरोगी घडू शकते. महिला खेळाडू अनेक विक्रम रचत असल्या तरी मुलींनी खेळणे आणि त्यात करीयर करण्याला त्यांच्या घरच्यांचा आणि समाजाचाही म्हणावा तितका पाठिंबा आढळत नाही. मुलींनी खेळावे पण वयात आल्यावर खेळ सोडून देऊन घरात रमावे, घरकाम शिकावे आणि थोडाफार अभ्यास करावा अशीच बहुसंख्य पालकांची इच्छा आढळते. खेळण्याची जिद्द बाळगणाऱ्या मुलींना अनेक प्रकारचे सामने खेळावे लागतात. मैदानावर जाण्याआधी घरच्यांच्या आणि समाजाच्या मानसिकतेशी लढावे लागते. समज-गैरसमज असतातच जोडीला. स्वतःला रोजच सिद्ध करत राहावे लागते. मीराबाई चानू, सलिमा टेटे, संगीता प्रधान, राणी रामपाल अशी कितीतरी नावे घेता येऊ शकतील. ज्यांनी लाखो मुलींना खेळण्याची प्रेरणा दिली. प्रीतीला तिच्या मनाप्रमाणे खेळू देणाऱ्या तिच्या पालकांचेही समाज नक्कीच कौतुक करेल आणि प्रेरणाही घेईल.