नांदगाव | प्रतिनिधी
नांदगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवार (दि. २३) रोजी सकाळी आठ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या इतर प्रशासकीय इमारतीत होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली आहे. मतमोजणी केंद्रावर विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये 14 टेबलवर 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.
प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मिळून एकूण ९६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष दहा टेबलवर टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नांदगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्रावर 1लाख 28,344 पुरुष,1लाख 14396 महिला असे एकूण 2 लाख 42 हजार 744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
हे ही वाचा: अण्णा, काका, की भाऊ येणार! कोण धक्का देणार, कोण विजयी होणार?
मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नांदगाव विधानसभा मतदार संघात उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल अशी माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा