Saturday, July 27, 2024
Homeनाशिकबुध्दस्मारक येथील महाबोधी वृक्षारोपण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

बुध्दस्मारक येथील महाबोधी वृक्षारोपण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक | Nashik

नाशिक येथील त्रिरश्मी लेणी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महाबोधी वृक्षाचेरोपण करण्यात येणार आहे. या महाबोधीवृक्षामुळे शहराच्या ऐतिहासिक महत्त्वात अधिक भर पडणार आहे. ज्या अनुयांनांना श्रीलंका येथे जावून बोधी वृक्षाचे दर्शन घेणे शक्य नव्हते त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर परिसर सुशोभीकरण व रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासन व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी वृक्ष भव्य महोत्सव २०२३ आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरातील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक येथील बुद्ध लेणी असलेल्या स्मारकाच्या परिसरात केले जाणार आहे.

या महोत्सवासाठी श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ येथील प्रमुख भिक्खू उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांसह अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

श्रीलंकेचे कला विभागाचे मंत्री विदुरम विक्रम नायक हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रीलंकेचे हेमरथाना नायक थेरो, मलेशियाचे सरणंकरा महाथेरो ,थायलंड येथील डॉ. पोरंचाईं पलावाधम्मो यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी सकाळी ११ वाजता बुद्ध स्मारकाच्या प्रवेशद्वारापासून बोधी वृक्षाची रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बुद्ध संघाच्या उपस्थित होणार आहे. बुद्ध संघाच्या वतीने बुद्धमूर्तीच्या समोर बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत १२ ते २ वाजेदरम्यान बोधी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यात भिक्खू संघाचे प्रवचन तसेच नाशिकच्या कलाकारांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे .

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न थेरो आहेत तर भदंत आर्यनाग, भदंत यु नागधम्मो महाथेरो, के. आर. लामा, भदंत आर. आनंद, भदंत सुमनसिरी, भदंत काश्यप, भदंत धम्मरक्षित, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर दहा ते बारा लाख अनुयायी येण्याची शक्यता असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२३०० वर्षापूर्वीच्या बोधिवृक्षाच्या फांदीचे वृक्षारोपण

भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच बोधिवृक्षाची फांदी २३०० वर्षापूर्वी प्रियदर्शी सम्राट अशोकांची मुलगी संघमित्रा यांच्या माध्यमातून बुद्धगया येथून श्रीलंकेला अनुराधापूर या ठिकाणी स्थापित करण्यात आली. याच बोधिवृक्षाच्या फांदीचे लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात रोपण करण्यात येणार आहे . बोधी वृक्षाच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या