लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
लासलगाव व परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील दोन कांदा व्यापाऱ्यांचे तीन कांदा शेड भुईसपाट झाले असून अंदाजे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे मात्र सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह व जोरदार वाऱ्याच्या वेगाने पाऊस सुरू झाला.या पावसामुळे कोटमगाव रोड येथील कांदा व्यापारी अनिल अब्बड यांच्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दोन कांदा शेड वाऱ्याचा जोरदार वेगामुळे जमीनदोस्त झाले त्यात अंदाजे बारा ते पंधरा लाख रुपये किमतीचे दोन शेड व अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा असे अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले तर दुसरे कांदा व्यापारी भाऊसाहेब लक्ष्मणराव जगताप यांचे जगताप अँड कंपनी यांचे ६ लाख रुपये किमतीचे शेड व अंदाजे ७ लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला .शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून पडलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे
शुक्रवारी सायकाळी आणि आज दुपारी झालेल्या पावसाने विज पुरवठा खंडित झाला होता तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली कांदा झाकण्यासाठी दुकानामध्ये ताडपत्री खरेदी करता गर्दी दिसून आली
दरम्यान लासलगाव बाजार समितीचे आवारात आज सकाळचे सत्रात ९५१ वाहना मधील १७हजार ६२६ क्विंटल कांद्याचा लिलाव झाला.