Thursday, May 9, 2024
HomeनाशिकNashik News : नाशकात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Nashik News : नाशकात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

नाशिक | Nashik

एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज दुपारच्या सुमारास नाशिक शहरात (Nashik City) पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काहीसे ऊन देखील पडले होते. मात्र, यानंतर चार वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ढग दाटून आले व त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास पावसाने नाशकात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisement -

आज सकाळपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होते. सुर्यदर्शनही तुरळक झाले. याशिवाय आज पहाटेपासूनच पावसाचे (Rain) थेंब पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो आज खरा ठरला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले. मात्र, या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.

जायकवाडीसाठी गंगापूरमधून विसर्ग सुरु

दरम्यान, अजून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हिवाळी मोसमी व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले.

दिंडोरी तालुक्यातील तिसगाव, बहादुरी परिसरात गारपीट

ओझे | विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारी तुरळक ठिकणी रिमझिम पाऊस पडला. मात्र सांयकाळी पाच वाजेपासून संपूर्ण दिंडोरी तालुक्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस तर तालुक्यातील तिसगाव बहादुरी परिसरात जोरदार गारपीट झाल्यामुळे द्राक्षबागासह टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अदांज व्यक्त केला जात आहे.

हवामान खात्याकडून २६ नोव्हेंबर पासून पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळ पासूनच वातावरणात बदल होऊन तालुक्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारनंतर तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिग चालू केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण तयार झाले. विशेष म्हणजे सध्या द्राक्षबागाचे काम चालू असून काही द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत असल्यामुळे गळकुजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार असून द्राक्ष बागेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर द्राक्षबागेत डावणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच ज्या द्राक्षबागाची अर्ली छाटणी झालेली असून द्राक्ष मन्यात पाणी उतरले आहे अशा बागांना क्रकिंगचा धोका निर्माण झाला असून या बेमोसमी पावसामुळे पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे द्राक्षबागा संकटात सापडल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

दरम्यान, तसे पाहिले तर सर्वच पिकांना हा पाऊस धोकादायक असल्याचे बोलले जाते. दिंडोरी, निफाड तालुक्यात द्राक्षबागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक वर्षी पडणाऱ्या बेमोसमी व गारपीटीमुळे या परिसरातील शेतकरी कर्जबाजारी झाला असून प्रत्येकवर्षी कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे शेती करावी कि, नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.

द्राक्षबगांसह काढणीला आलेल्या भात पिकांचे अवकाळीमुळे नुकसान

दिंडोरी | Dindori

तालुक्याच्या पूर्व भागात ऐन फुलाऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागा तर पश्चिम भागात काढणीला आलेल्या भात पिकासह विविध भाजीपाल्याचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळीस्थितीमुळे चिंतेत असलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करत पीक विमा भरपाई व शासकीय नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी केली आहे…

गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हलकासा शिडकावा होत पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा पाच वाजेच्या दरम्यान सुसाट वारा व विजेच्या कडकडाटांसह दिंडोरी शहरासह मोहाडी खडक सुकेने,पालखेड,खेडगाव, लोखंडे वाडी, जोपुळ, जानोरी, कादवा कारखाना लखमापूर वणी, निगडोळ, पाडे, रासेगाव, ढकांबे आदी सर्व भागात कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस झाला. तिसगाव परिसरात काही ठिकाणी गारा ही झाल्या. पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली.

सध्या द्राक्ष पीक फुलोऱ्यात असून डिपिंग थिनिंगची कामे सुरू होती. वादळी वारा व पावसाने मोठ्या प्रमाणात मनी गळ होत नुकसान झाले आहे. तसेच घडकुज ही होण्याची भीती आहे. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तर कारले, भोपळे, मिरची आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले असून पुढील दोन तीन दिवसात नुकसानीची तीव्रता दिसणार आहे.

दरम्यान, ऊस तोडणी कामगारांचे पावसाने मोठे हाल झाले असून पावसामुळे कारखान्याचा गळीत हंगामही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम भागात भाताचे नुकसान झाले आहे.अगोदरच परतीचा पाऊस न झालेल्या उत्पादन घटले असताना अवकाळीने राहिलेल्या पिकांचेही नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करत पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी दिला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या