निफाड/कसबे सुकेणे । प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील निफाड शहरासह, लासलगाव, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, भाऊसाहेबनगर, पिंपरी व परिसराला गुरुवार (दि.3) सायंकाळी 5.30 ते 7 या कालावधीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काढलेला द्राक्ष व तयार झालेला कांदा या पिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय उशिरा पेरण्या झालेल्या गहू पिकालाही मोठा धोका निर्माण होणार आहे.
गेल्या तीन दिवसापासून परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अगोदरच पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे बर्याचशा शेतकर्यांनी गव्हाची हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली होती. मात्र, जे उशिरा पेरलेले गहू होते, अशा गहू पिकाला जोरदार पावसाने झोडपल्याने गहू भुईसपाट झाले आहे.
अनेक शेतकर्यांचे कांदा पिक काढलेले असून या पिकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने व जोरदार पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पावसामुळे कांदा लवकर खराब होऊन भविष्यात जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकर्यांना असा कांदा साठवता येणार नसल्याने आहे त्या किमतीला विकावा लागणार आहे.
तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम दर्जाचे द्राक्षबागा असल्याने व त्यांना पेपरने आवरण ठेवल्याने द्राक्ष आवरणाभोवती असलेला कागद ओला होऊन निर्यातक्षम द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे उर्वरित द्राक्षबागांनाही मोठा धोका निर्माण झाला असून हा बेमोसमी पाऊस म्हणजे शेतकर्यांच्या मुळाशी उठणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.