नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफ प्लानमुळे नव्या संकटात सापडले. यामुळे जागतिक स्तरावरील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. भारतालाही याचा परिणाम भोगावा लागला. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल १९ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा खुद्द अमेरिकेत मोठा विरोध पहायला मिळाला. यानंतर आपल्या आडमुठ्या भूमिकेपासून आता डोनाल्ड ट्रम्प काहीसे नरमले असून, ही टॅरिफ योजना ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या निर्णयावरून घूमजाव केले. बहुसंख्य देशांवरील शुल्काला ९० दिवसांची स्थगिती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचवेळी चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून व्यापारयुद्ध अधिक तीव्र करत असल्याचे संकेत दिले. त्यांनी भारतासह ७५ देशांना ‘रेसिप्रोकल टॅरिफ’मधून ९० दिवसांसाठी दिलासा दिला आहे. या कालावधीत फक्त १० टक्के शुल्क लागू राहील.
जगातील बड्या देशांमध्ये रेसिप्रोकल टॅरिफमुळे तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाकडे चीनवर दबाव टाकण्याची रणनिती म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे एका गटाचे म्हणणे आहे की, जागातील बाजारांचे कोसळणे आणि मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांनी घुमजाव केले आहे. “मी ९० दिवसांसाठी PAUSE घेतला आहे. या दरम्यान अन्य देशांसाठी ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ कमी करुन १० टक्के करतोय. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत आहे” असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ कर लादला आहे. चीनने अमेरिकेवर लादलेला ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५० टक्के कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे. यानंतर आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध नव्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्क्यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के एवढा टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन वस्तू्ंवर लावण्यात आलेले हे अतिरिक्त टॅरिफ १० एप्रिलपासून लागू होईल. यावरही आता अमेरिकेने कुरघोडी करत चीनवर १२५ टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली आहे.
अमेरिका बाजारात तेजी
ट्रम्प यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी, अमेरिकी शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. डाऊ जोन्स निर्देशांक २,३००पेक्षा जास्त अंकांनी, म्हणजे ६.२ टक्क्यांनी वाढला. तर एसअँडपी ५००मध्ये सात टक्क्यांची वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नासडॅक ८.५ टक्क्यांनी वाढला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा