Saturday, May 4, 2024
Homeनगरसाई मंदिर स्टेजचा वापर केवळ धार्मिक कारणासाठीच व्हावा

साई मंदिर स्टेजचा वापर केवळ धार्मिक कारणासाठीच व्हावा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानने साई मंदिरात साजरे होणारे विविध धार्मिक, सांस्कृतिक उत्सव, तसेच श्री साईचरित्र पारायणा दरम्यान उभारण्यात आलेले स्टेज धार्मिक कारणाव्यतिरीक्त कोणत्याही कारणांसाठी वापरण्यात येऊ नये तसेच मंदिरातील उत्सवाच्यावेळी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यासाठी जुन्या साईभक्तांना संधी द्यावी, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

साईमंदिर परिसरातील बॅरिकेट काढून चारही महाद्वार साईभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे. श्री साईबाबा संस्थान, ग्रामस्थ व नाट्य रसिक संच यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित होणारा श्री साईचरित्र पारायण सोहळा, पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून साजरा करण्यात यावा.

पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचा वापर चुकीच्या कामासाठी होऊ नये. यासाठी साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी पारायणा व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा, राजकीय भाषणे अथवा अन्य अवांतर चर्चा होऊ नये यासाठी साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ व नाट्य रसिक संच यांनी एकत्रित आदर्श आचारसंहिता ठरविणे आवश्यक आहे. नाट्यरसिक संचाच्या सर्व सदस्यांनी देखील सहकार्य करावे.

पारायण सोहळा काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात उध्दव महाराज मंडलिक अथवा अन्य विद्वान महंतांचे मार्गदर्शन घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करावे. साईबाबा संस्थानने वारकरी सांप्रदायाची कार्यशाळा सुरू करावी. त्यातून मंदिराची धार्मिक परंपरा जपण्यास मदत होईल. यात होणारे हरिपाठ व धार्मिक किर्तनाच्या आयोजनामुळे धार्मिक वातावरण तयार होईल.संस्थानने उत्सव काळाव्यतिरिक्त रामायण कथा,भागवत कथा असे कार्यक्रम ठेवावेत. त्यामध्ये प्रसिध्द प्रवचनकार मुरारीबापू तसेच महंतांना निमंत्रित करून या कार्यक्रमांचे प्रसारण करावे.

उत्सव काळात साईबाबा मंदिरात विद्युत रोषणाई केली जाते. यापूर्वी बर्‍याच काळापासून मुंबई अथवा बाहेरील गावचे साईभक्त मोफत रोषणाई करायचे. मात्र काही काळापासून या भक्तांना संधी दिली जात नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. साईबाबा संस्थानने त्यांना पुन्हा निमंत्रित करून याच साईभक्तांना रोषणाई करण्याची संधी द्यावी. ज्याप्रमाणे विद्युत रोषणाई केली जाते त्याचप्रमाणे फुलांचे मोफत डेकोरेशन करणार्‍या जुन्या साईभक्तांनाच प्राधान्याने संधी द्यावी.

उत्सव काळातील फुलांचे मोफत डेकोरेशन करण्याचे सर्व अधिकार व मान्यता साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्वतः नियंत्रित करावी. पुर्वी गुरुपौर्णिमा उत्सव काळात विविध प्रकारची वाद्ये सहभागी होत शाही मिरवणूक निघत असे. या मिरवणुकीत सहभागी असणारी वाद्ये व यातील वादक प्रमुख आकर्षण ठरत असे.परंतु अलीकडच्या काळात हे वाद्यवृंद व बँड मिरवणुकीत सहभागी होताना दिसत नाही. पूर्वीच्या या वादकांना साईबाबा संस्थानने निमंत्रित करून त्यांच्या निवासाची सोय करत उत्सव काळात वादनाची संधी द्यावी.

शिर्डी ग्रामस्थांनी वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सर्व मागण्या अतिशय महत्त्वाच्या असून साईबाबा संस्थानने या सर्व मागण्यांवर चर्चा करून त्या त्वरित मान्य कराव्यात, असेही म्हटले आहे.

सदरील निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, अभय शेळके, सुजित गोंदकर, मधुकर कोते आदींसह शिर्डी ग्रामस्थांच्या सह्यानिशी देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या