Wednesday, June 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त एलसीबीचा पीएसआय वाघ निलंबित

Ahilyanagar : राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त एलसीबीचा पीएसआय वाघ निलंबित

नेवाशातील गुन्ह्याप्रकरणी हप्ता मागणी व खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गाजलेल्या कारवाईप्रकरणी हप्त्याची मागणी केल्याच्या गंभीर आरोपांच्या चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड पीएसआय) राजेंद्र देवमन वाघ याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हा आदेश काढला असून वाघ याच्याविरोधात नियमित विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून विभागीय चौकशीत आणखी कोणते खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची सुरूवात छत्रपती संभाजीनगर येथील गजानन अ‍ॅग्रो सेल्स कॉर्पोरेशनचे मालक संजय अगरवाल यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीपासून झाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी चौकशी करून अधीक्षक सुदर्शन यांना अहवाल सादर केला. या अहवालात वाघ याने कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चौकशी अहवालानुसार नेवासा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील संशयित संदीप शिंदे (रा. भानसहिवरे) यांच्याकडे धान्य खरेदी-विक्रीचा वैध परवाना असतानाही त्यांना ऑगस्ट 2025 मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील पंचवटी हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे रेशनचे धान्य खरेदी-विक्री करतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करायचा नसेल तर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केल्याचा आरोप चौकशीत नमूद करण्यात आला आहे. शिंदे यांनी धान्य खरेदीच्या पावत्या दाखविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्या न पाहताच त्यांचे गोदाम सील करण्यात आले आणि 18 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शिंदे यांनी न्यायालयात खरेदीच्या पावत्या सादर केल्यानंतर न्यायालयाने जप्त धान्य परत करण्याचे आदेश दिले होते.

चौकशीत असेही नमूद करण्यात आले आहे की, धान्य व्यापारी भगवान पुंड (रा. करजगाव) आणि संजय अगरवाल यांनाही गुन्हा दाखल होण्यापूर्वी वाघ याने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून हप्त्याची मागणी करण्यात आली होती. महिन्याला पैसे दिले नाहीत तर गुन्हा दाखल केला जाईल, असा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप कॉल लॉगचे छायाचित्र स्वरूपातील पुरावे चौकशीदरम्यान प्राप्त झाल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच अगरवाल यांनी त्यांच्या कंपनीची नोंदणी कागदपत्रेही सादर केली होती. दरम्यान, या सर्व बाबींचा विचार करून अधीक्षक सुदर्शन यांनी वाघ याला निलंबित केले आहे.

पंचनाम्यावरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील पंच यांनी चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात गंभीर बाब समोर आणली आहे. त्यांनी सांगितले की, पंचनामा पूर्ण झाल्यानंतर हस्तलिखित मजकुराखाली सही घेतली होती; मात्र संगणकीकृत पंचनाम्यावर असलेली सही त्यांच्यासारखी दिसत असली तरी ती स्वतःची नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनीही चौकशीत दिलेल्या जबाबात संदीप शिंदे यांनी भगवान पुंड किंवा संजय अगरवाल यांची नावे सांगितलेली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. शिंदे यांनी धान्य शेतकरी, अडत व्यापारी आणि आठवडी बाजारातून खरेदी केल्याचे सांगितले होते. तरीही फिर्यादीत पुंड आणि अगरवाल यांची नावे कशाच्या आधारे समाविष्ट करण्यात आली, हे सांगता येणार नसल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.

पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल
वाघ याला नुकतेच राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. तो वर्षांनुवर्ष एलसीबीत नियुक्तीला आहे. चौकशी अहवालानुसार संदीप शिंदे यांच्यासह संजय अगरवाल आणि भगवान पुंड यांच्याकडून बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्याने एलसीबीत असल्याचा आणि त्याच्या पदाचा गैरवापर केला. हप्त्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांच्याविरोधात हेतुपुरस्सर गुन्हा दाखल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar काही काळासाठी मान्सून रेंगाळल्यानंतर आता पुन्हा मोसमी वार्‍यांचा वेग वाढला आहे. अहिल्यानगर, पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला असून दोन दिवसांत...