नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवन इथे आयोजित एका समारंभात 2026 या वर्षासाठी परिचारिका क्षेत्रातल्या ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ प्रदान केले. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिलेले अनुकरणीय योगदान, अढळ समर्पण आणि समाजाच्या कल्याणासाठी दाखवलेली उत्कृष्ट वचनबद्धता यांची दखल घेत विविध प्रदेशांतील आणि आरोग्य क्षेत्रांतील एकूण 15 परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ‘सहाय्यक परिचारिका दाई’उज्ज्वला महादेव सोयाम यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही या प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी नमूद केले की, “परिचारिका कर्मचारी सर्वोच्च सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतात आणि अनेकदा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.”
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या अढळ करुणा, परिस्थितीशी जुळवून घ्यायची क्षमता आणि समर्पण यांचा गौरव करताना नड्डा म्हणाले की, “या वर्षाच्या ‘आमच्या परिचारिका. आमचे भविष्य. जीवरक्षक सक्षम परिचारिका’ या संकल्पनेला अनुसरून, परिचारिका कशा प्रकारे आपली आरोग्य यंत्रणा बळकट करतात आणि देशाच्या प्रगतीला चालना देतात हे आपण पाहतो. त्यांच्या कल्याणासाठी गुंतवणूक करून, आपण आरोग्यदायी समुदाय, समृद्ध समाज आणि एक भक्कम भविष्य घडवत असतो. आपल्या सर्वांची निस्वार्थपणे काळजी घेणाऱ्यांना जपूया, त्यांचे संरक्षण करूया आणि त्यांना प्रोत्साहन देऊया.”
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे स्थापित ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’, वैशिष्ट्य असलेल्या समर्पण, करुणा आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गुणाचा सन्मान करतो. हे प्रतिष्ठित पुरस्कार केंद्र आणि राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत परिचारिका, दाई , सहाय्यक परिचारिका दाई आणि महिला आरोग्यदूतांना दिले जातात. प्रत्येक पुरस्कारात गुणवत्ता प्रमाणपत्र, 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि या आरोग्य योद्ध्यांनी दिलेल्या अमूल्य सेवेबद्दल राष्ट्राची कृतज्ञता दर्शवणारे पदक यांचा समावेश असतो.





