Saturday, May 25, 2024
Homeनाशिकप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

तालुक्यातील प्राथमिक शाळेला ( Primary Schools )अडीच महिने उलटूनही पाठ्यपुस्तके ( Text Books )उपलब्ध न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी वरिष्ठांनी लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निफाड तालुका शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत दरवर्षी राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. याची मागणी दरवर्षी एप्रिल महिन्यात नोंदवली जाते. त्यानुसार जून महिन्यात शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हास्तर, तेथून तालुकास्तर व तिथून केंद्रस्तरापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचवली जातात. त्यानंतर केंद्रप्रमुखांमार्फत प्रत्येक शाळेला पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.

यावर्षी मात्र आपण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना निफाड तालुक्यातील अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले आहेत. पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यापासून वंचित आहेत. शिक्षकांनादेखील वर्गात अध्यापन करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

इयत्ता 1 लीचा वर्ग वगळता इतर वर्गांना शिक्षकांनी जुनी पाठ्यपुस्तके जमा करून ज्यांना नवीन पुस्तके मिळाली नाही त्या मुलांना त्याचे वाटप केले आहे. इयत्ता 1 लीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने इयत्ता 1 लीचे सर्व विषय एका पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत. त्याचे एकात्मक बालभारती भाग 4 केले आहे. त्यामुळे इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपस्तके मिळणे नितांत गरजेचे आहे.

निफाड तालुका पूर्व भागातील लासलगाव, विंचूर, पाचोरे, देवगाव या केंद्रातील केंद्रप्रमुख यांच्याकडे पुस्तके उपलब्धतेबाबत माहिती मागितली असता वरील बाब उघडकीस आली. जि.प. प्राथमिक शाळा केंद्रानुसार इयत्ता 1 लीच्या कमी असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या आकडेवारीमध्ये लासलगाव (110 संच), पाचोरे (30 संच), विंचूर (60 संच), देवगाव (10 संच) असे एकूण 210 पाठ्यपुस्तक संच कमी असून याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, गटशिक्षणाधिकारी तुंगार यांच्याकडे चौकशी केली असता जि.प. शिक्षण विभागाकडे केंद्रनुसार कमी असलेल्या पुस्तकांची मागणी पाठवली असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह लासलगाव परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

पाठ्यपुस्तके त्वरित उपलब्ध करून देऊ

तालुक्यात बहुतांशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत. तथापि काही ठिकाणी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्यास त्वरित उपलब्ध करून दिली जातील. सदर पाठ्यपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे ऑनलाईन केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे कटाक्षाने बघितले जाईल. इयत्ता 1 लीचा अभ्यासक्रम नवीन असल्याने त्या इयत्तेला प्राधान्य देण्यात येईल.

केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, निफाड)

- Advertisment -

ताज्या बातम्या