अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी 15 मे नंतर आदेश निघणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या काढलेल्या सुधारित आदेशामुळे नगर जिल्ह्यात 400 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. सध्या शिक्षकांची संच मान्यता अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गुरूजींच्या बदल्याच्या आदेशाकडे सर्वाचे लक्ष लागले असून दुसरीकडे नवीन संचमान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे केडर असणार्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अद्याप ग्रामविकास विभागाकडून आदेश निघालेले नाहीत. नगर जिल्ह्यात 11 हजारांहून अधिक शिक्षक सध्या कार्यरत असून या शिक्षकांच्या पदस्थापनेसाठी संचमान्यतेचे सुधारीत काढण्यात आलेले आहेत. यात आता 75 विद्यार्थ्यांच्या पट संख्येवर शिक्षकांचे पद मंजूर करण्यात आले आहे. पूर्वी शिक्षकांच्या एका पदासाठी 60 विद्यार्थ्यांची अट होती.
शिक्षकांच्या संच मान्यतेच्या सुधारीत आदेशामुळे एकट्या नगर जिल्ह्यात 400 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. जिल्ह्यातील संचमान्यता जवळपास अंतिम झाली असून लवकरती जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने बदली पात्र शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनूसार शिक्षकांची यादी तयार करून ठेवलेली आहे. यात संबंधीत शिक्षबकांनी स्वत:ची प्रोफाईल अपडेट करून ठेवलेली आहे. ग्रामविकास विभागाच्यावतीने आदेश निघताच बदल्यांसाठी वेळापत्रकानूसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
दोन वर्षापासून प्रतिक्षा
मागील वर्षी लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी ऑनलाईन बदल्यासाठी तयारी यामुळे दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा शिक्षकांना नेमणूका देण्यात आलेल्या होत्या. यासह न्यायालयाच्या आदेशानूसार काही शिक्षकांची सोय करण्यात आली. मात्र, दोन वर्षापासून शिक्षकांच्या जनरल बदल्याची प्रक्रिया झालेली नसल्याने मोठ्या संख्याने शिक्षकांची बदल्यांची प्रक्रियेकडे नजरा लागल्या आहेत.