मुंबई । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होत आहे. मुंबईकर मतदारांना शेवटची साद घालण्यासाठी महायुतीची आज शिवाजी पार्कवर प्रचारसभा झाली . या प्रचासभांच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आज मुंबईत होते . आजच्या प्रचारसभेच्या निमित्ताने महायुती कडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले .
या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुंबईतील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते .
पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर टीका केली. मोदींनी ‘रामराम’ म्हणत आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे चं नाव घेत भाषणाची सुरुवात केली. येणाऱ्या काळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. त्यासाठी मी दिवस-रात्र काम करणार आहे, असं मोदी म्हणाले. काँग्रेस दिवसरात्र वीर सावरकरांविरुद्ध बोलत असते. मी एनसीपीच्या नेत्याला आव्हान देतो. राहुल गांधींकडून वदवून घ्या की ते कधीही वीर सावरकरांच्या विरोधात एक शब्द बोलणार नाहीत. ते तसं करु शकत नाहीत. कारण निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा वीर सावरकरां विरुद्ध बोलतील असे मोदी म्हणाले.
जनादेश चोरुन सरकार बनवलं, त्यांनी विकास कामात शत्रुत्व आणलं. अनेक प्रकल्प लटकवले. अनेक प्रकल्प रखडले. मोदीचा एक महत्वपूर्ण संकल्प आहे. मोदी मुंबईला त्यांचा हक्क परत करण्यासाठी आला आहे. मुंबईचे आधुनिकीकरण होणार आहे. मेट्रोचे विस्तारिकरण होत आहे. वंदे भारत ट्रेन चालत आहेत. नवी मुंबईत एअरपोर्ट बनत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळेल, असं मोदी म्हणाले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कडे केल्या ह्या मागण्या
आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच मागण्यादेखील मांडल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहे. यामुळे मी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडतो आहे.१) म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. २) म्हणजे शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमावी ३) शालेय शिक्षणात शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम समावेश करावा, ४) मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरीत पूर्ण करावे ५)देशातील मुठभर देशद्रोही मुस्लीमांच्या अड्ड्यांवर छापा टाकून देश सुरक्षित करावा, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना पंतप्रधान मोदींना केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी पाठिंबा देतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.