दिल्ली | Delhi
आज देश 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या वेळेस IAF helicopter द्वारा लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात एनडीए सरकारने केलेल्या कामांचा हिशोब दिला. तसेच या भाषणात पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एवढेच नाही तर पुढील ५ वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुन्हा देशाला संबोधित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केली. मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि तुष्टीकरणमुक्त भारत करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले..