भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया. भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
राजस्थानची भूमी शूरवीरांच्या-वीरांगनांच्या शौर्याची, बलिदानाची भूमी आहे. आपल्या मातृभूमीच्या, धर्माच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी येथे केसरिया आणि जोहार हे उत्सवासारखे केले गेले. राजस्थानमधील जैसलमेर या संस्थानात अशाच एका वीरांगनेेने राजकुमारी रत्नावतीने जैसेलमेरच्या किल्ल्याचे रक्षण करतांना आपल्या पराक्रमाने यवनी सैन्याला पळता भुई थोडी केली. तिने अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनेत प्रमुख असलेल्या मलिक कफूर यास त्याच्या शंभर सैनिकांसह बंदी बनविलेच. परंतु, बंदीवासातील शत्रू कैद्यांना अतिथी मानून प्रसंगी स्वतः उपाशी राहून शत्रूला जेवण दिले.
जैसलमेरचा राजा रतनसिंह याची कन्या राजकुमारी रत्नावती बुद्धिमान, धाडसी, शस्त्रविद्येत निष्णात आणि गृहकृत्य दक्ष होती. घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजीत पारंगत होती.
हिंदुस्थानात दिल्लीचा बादशहा अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनेने धुमाकूळ घातला होता. राजा रतनसिंह मोहिमेची तयारी करून मोहिमेवर निघाले. परंतु त्याला आपल्या जैसलमेरच्या किल्ल्याच्या रक्षणाची काळजी होती. राजकुमारी रत्नावती म्हणाली, पिताजी महाराज आपण निश्चित होऊन मोहिमेवर जा. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत किल्ल्याच्या विटेलाही धक्का लागणार नाही. मुलीचे बोलणे ऐकून राजा रतनसिंह हसून म्हणाले, बेटा, या विश्वासावरच तर आम्ही मोहिमेवर निघालो आहोत. परंतु सावधान राहा. कारण शत्रू फक्त शूरच नाही तर तो धूर्त आणि छलकपट करणार आहे. मुलीने वडिलांना विश्वास दिला.
उंचपुर्या बलिष्ठ अरबी घोड्यावर मर्दानी पोशाख घालून, कमरेला दोन दोन तलवारी लावून, पाठीवर धनुष्यबाण घेऊन राजकुमारी रत्नावती किल्ल्याची जातीने निगराणी करत होती. अल्लाउद्दीन खिलजीची सेना आणि मलिक कफूर राजपुतान्यातील एकेका राजाला पराभूत करत येत होता. राजा रतनसिंह जैसलमेरला नाही हे बघून त्याने आपला मोर्चा जैसलमेरकडे वळवला. त्याच्या सैनिकांनी किल्ल्याला मुंगीसारखा वेढा घातला. किल्ल्याकडे रसद पोहोचवणारे आणि दळणवळणाचे सर्व मार्ग शत्रूंने बंद केले. मलिक कफूरच्या सैन्याने किल्ल्यावर गोळीबार केला. बाणांचा वर्षाव केला. या जबरदस्त हल्ल्याने राजकुमारी रत्नावती अजिबात डळमळीत झाली नाही की घाबरली नाही. किल्ल्याच्या संरक्षणार्थ ठामपणे उभी राहिली. ती आपल्या मैत्रिणींसोबत किल्ल्याच्या बुरुजांवर चढून शत्रूंवर बाणांचा वर्षाव करीत असे. राजकुमारी रत्नावती आत्मविश्वासाने म्हणत असे, मी स्री आहे परंतु अबला नाही. माझ्यातही हिम्मत आहे. आम्हाला शत्रू समजतात तरी काय?
मलिक कफूरची सेना राजकुमारीच्या या हल्ल्याने बेजार झाली होती. किल्ल्याचा एक चिरा देखील हालायचे नाव घेत नव्हता. राजकुमारी त्यांना म्हणत होती, माझ्या किल्ल्यांवर गोळ्याची बरसात करून किल्ल्याला खराब करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.
सैन्य तुकडीने एका दिवशी किल्ल्यावर आक्रमण केले. किल्ल्याच्या अर्ध्या भिंती चढून ते वर आले. तेव्हा रत्नावतीच्या सैन्य तुकडीने किल्ल्यावरुन दगड आणि तप्त वाळूचा त्या सैनिकांवर असा मारा केला की गफूरचे सैनिक भाजून निघाले. सैन्य तोबा.. तोबा.. करत आपले प्राण वाचवत पळून गेले. जे वरपर्यंत आले त्यांना तलवारीच्या पात्याने सपासप कापून काढले. मलिक कफूरने वेढा जास्तच कडक केला. खूप दिवस, खूप महिने गेले. किल्ल्यावरचे धान्य संपत आले होते. राजकुमारी रत्नावतीला वडिलांकडून येणारे संदेशही बंद झाले होते. त्यांचा कुठलाही संदेश नाही म्हणून रत्नावती मध्यरात्री किल्ल्याच्या एका बुरुजावर बसली होती. तेव्हा तिला एक व्यक्ती अंधारात पाठीवर गाठोडे घेऊन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना दिसली. रत्नावतीने ओळख विचारली.तो म्हणाला मी राजा रतनसिंहांची खबर घेऊन आलोय.
किल्ल्याचा दरवाजा आधी उघडा तेव्हाच मी सांगतो. खूप विचारल्यावरही त्याने काही सांगितले नाही. तेव्हा रत्नावतीने त्याला बाण मारून जखमी केले. तो शत्रू सैन्याचा खबर्या होता. किल्लेदाराला सोन्याच्या नाण्यांची लाच देऊन किल्ल्याचा दरवाजा उघडून घेण्यासाठी तो आला होता. रत्नावतीने त्याचा हेतू जाणून घेतला. त्याच्या जागेवर त्याचा वेश घालून आपल्या सैनिकाला कफूरकडे पाठवले. मलिक कफूर शंभर सैनिकासह किल्लेदाराच्या मदतीने किल्ल्यात शिरला. किल्लेदाराला त्याने परत सोन्याच्या नाण्यांचे गाठोडे लाच म्हणून दिले. किल्लेदार ते गाठोडे ठेवण्यासाठी किल्ल्याच्या आतमध्ये गेला तो बाहेर आलाच नाही. मलिक कफूर आणि त्याचे शूर शंभर सैनिक जैसलमेर किल्ल्याच्या भुलभुलय्या मध्ये हरवून गेले. त्यांना बाहेर पडायला की मध्ये जायलाही रस्ता सापडेना. थोड्याच अवधीत रत्नावती व तिच्या सैन्याने त्यांना बंदी बनवले. परंतु शत्रुने किल्ल्याला वेढा घेऊन अठरा आठवडे होत आले होते. अल्लाउद्दीनच्या गुप्तचरांनी त्याला सांगितले नऊ महिने किल्ला लढवला तरी तो हाती येणार नाही. तह करणे जरुरी आहे. बाहेरुन राजा रतनसिंह यांनी माळव्यापर्यंत शाही सेनेला पिटाळून लावले होते. शाही सैन्य सैन्याला पिण्यासाठी कुठल्याही तळ्यात पाणी ठेवले नव्हते. अशा कोंडीत सापडल्यावर राजा रतन सिंह यांच्याशी अल्लाउद्दीन खिलजीने संधीचा प्रस्ताव पाठवला. इकडे जैसलमेर किल्ल्यावर लोकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत होते. अशा परिस्थितीत राजकुमारी रत्नावती शंभर कैद्यांना रोज पोटभर अन्न देत असे. आपल्या अतिथी धर्माला राजकुमारी रत्नावती जागली होती. राजा रतनसिंह आणि अल्लाउद्दीन खिलजीत संधी झाली. राजा रतनसिंह जैसेलमेर किल्ल्यावर परतले. रत्नावतीचे त्यांना खूप कौतुक वाटले. कफूर आणि शंभर सैनिकांना तहानुसार सोडून देण्यात आले. त्यांना सोडते वेळी राजा रतनसिंह मलिक कफूरला म्हणाला,गफूर साहब,माझ्या गैरजरीत असुविधा झाली असेल तर त्यासाठी आम्हाला क्षमा करावी. युद्धाचे नियम मोठे कडक असतात.शिवाय आमची कन्या राजकुमारी रत्नावती एकटी होती. तिला जे शक्य होते ते तिने केले.त्यावर मलिक कफूर म्हणाला, महाराज, जैसलमेरची राजकुमारी मानव नसून खरोखर देवता आहेत. त्यांनी स्वतः उपाशी राहून शत्रूलाही अन्न खाऊ घातले. ही गोष्ट मी जीवनभर विसरणार नाही.अशा प्रकारे जैसलमेरचा किल्ला शत्रूपासून सुरक्षित ठेवत,शत्रूला हरवून आणि ‘अतिथी देवो भव:’या आपल्या संस्काराला जागत प्रसंगी स्वतः उपाशीपोटी राहून शत्रूला अन्न देणार्या या भूमीची राजकुमारी रत्नावती ही खरोखर थोर कन्या होऊन गेली.