अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कार्यालयाची वसुलीची रक्कम घेऊन जाणार्या खासगी नोकरदारास दोन दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चौघांनी रस्त्यात अडवून मारहाण करून लुटले. नोकरदाराकडील रोख रक्कम, मोबाईल, बायोमेट्रिक स्कॅनर असा एक लाख 49 हजार 547 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. पवन शेषराव तुपे (वय 27 मूळ रा. लोडारे, ता. नांदगाव, जि. नाशिक, हल्ली रा. हिंदुत्व चौक, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) असे या नोकरदाराचे नाव आहे.
ही घटना दिनांक गुरूवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता नगर तालुक्यातील खारे कर्जुने ते निमगाव घाणा रस्त्यावर खारे कर्जुने शिवारात घडली. याप्रकरणी तुपे यांनी शुक्रवारी (21 फेब्रुवारी) दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपे हे ऑफिसची वसुलीची रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर व पॅशन दुचाकीवर चार अनोळखी इसम आले.
त्यांनी तुपे यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने पाठीमागून मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या ताब्यातील एक लाख 32 हजार 147 रुपयांची वसुलीची रक्कम, 1 हजार 400 रुपयांची पाकीटमधील रोख रक्कम व पॉकेटमध्ये असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इंडसन बँकेचे एटीएम, एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड, अकरा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल व चार हजार पाचशे रूपये किमतीचे बायोमेट्रिक स्कॅनर असा एकूण एक लाख 49 हजार 547 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, तुपे यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू केला आहे.