शिर्डी । Shirdi
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या प्रचारसभांमधून आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. यादरम्यान, प्रियंका गांधी यांनीही विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. शिर्डीतील सभेतून प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत प्रियंका गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आज येथे सभा होत आहे, त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते. आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले. आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली. महाराष्ट्र सामाजिक क्रांतीची धरती आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची ही धरती असून येथे कणाकणात सत्य, समानता, मानवता आहे. महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली.
महाराष्ट्रातून स्वातंत्र्याची लढाई मजबूत झाली. इथल्या मातीतील संतानी मानवतेचा संदेश आणि सत्याची शिकवण दिली. मात्र मोदीजींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे? असा सवाल करत त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि आमदार काहीही बोलायला लागले असून ते महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली, सिंधुदुर्गातील पुतळा पडला, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तर यावेळी त्या म्हणाल्या, मी मोदींना आव्हान देते की, ‘त्यांनी एकदा जातीय जनगणना करणार असल्याचं जाहीर करावं.’ तर राहुल गांधींना मोदी घाबरू लागले आहेत म्हणून ते त्यांच्यावर टीका करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि यांचे विचार वेगळे आहेत. मात्र त्यांच्याविषयी कायमच मनात आदर असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात पाठवले. यावरून देखील प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. मागील दहा वर्षापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रियांका गांधी यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर टिका केली आहे. त्या म्हणाल्या, राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. तर दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसून केला जात आहे. निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिण योजना लागू करण्यात आल्याचा आरोप प्रियांका यांनी केला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पंधराशे रुपये टेकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आली की तीन-चार महिने आधी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले गेले आणि महिला आम्हाला मतदान करतील असे त्यांना वाटत आहे. मात्र बहिणींनी लक्ष्यात ठेवावे, अडीच वर्षापासून राज्यात यांचे सरकार आहे. तर दहा वर्षापासून केंद्रातही यांचेच सरकार आहे. असे असताना आताच पैसे का दिले जात आहेत? असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.