Sunday, September 15, 2024
Homeनाशिकमुलगी-जावयाची बैलगाडीतून मिरवणूक

मुलगी-जावयाची बैलगाडीतून मिरवणूक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

मुलीचा मान व जावयाला वाण अशा या धोंड्याच्या महिन्याला आता आधुनिक झालर मिळाली असली तरी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपरिक पध्दतीने मराठमोळया थाटात हे पर्व साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी त्यांनी थेट सहा बैलगाड्या गावातून मागवल्या असून त्याची सजावट करुन जावई व मुलीची त्यावरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लेझिम पथक, हलगी, टाळ – मृदुंगाचा गजरही व्हावा, यासाठी कलाकारांना निमंत्रीत केले आहे. 13 ऑगस्ट रोजी रवी शंकर मार्गावरील शुभभाग्य या बंगल्याजवळ सकाळी 9 वाजेपासून हा सोहळा रंगणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही देण्यात आला आहे. जावई धोतर, कुर्ता व टोपी परिधान करणार आहे. तर मुलगी ही नववारीचा शृंगार करणार आहे. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पध्दतीने केले जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी व फुलांची सजवाट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी असणार आहे तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगणार आहे. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, 13 बहिणी व सर्व जावई येणार आहे.

या हटके सोहळ्याबाबत बोलतांना गौतम कांतीलाल हिरण यांनी सांगितले की, आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी, यासाठी थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर 33 महिन्यांनंतर अधिकचा महिना येत असतो. यावेळी मुलीचा मान व जावयाला वाण दिले जाते. त्यामुळे हा सोहळा आम्ही वेगळ्या पध्दतीने साजरा करणार आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या