Monday, May 27, 2024
Homeनगरप्रा. होलेंच्या मारेकर्‍यांमागे पोलीस वेगात

प्रा. होलेंच्या मारेकर्‍यांमागे पोलीस वेगात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रा. शिवाजी होले (रा. जाधव पेट्रोल पंपाजवळ कल्याण रोड, नगर) यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना 23 फेब्रुवारीला घडली होती. याला आठ दिवस उलटूनही खुनी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दोन अधिकार्‍यांचा या पथकामध्ये सहभाग आहे. दरम्यान हा खून लुटण्याच्या उद्देशातूनच झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. तशी फिर्यादही पोलिसांत दाखल आहे. त्यादृष्टीकोनातून तपास करण्यावर पोलिसांनी भर दिला असून लवकर खुनींना अटक करण्यात त्यांना यश येईल, अशी शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

प्रा. होले हे नगर शहरात राहत होते. ते श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. 23 फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर ते नातेवाईक अरुण शिंदे (वय 45 रा. नेप्ती ता. नगर) यांच्यासोबत केडगाव बायपास येथील हॉटेल के. 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ दारू पित बसले होते. तेथे आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून प्रा. होले यांना पिस्तुलातून गोळ्या घातल्या.

यात प्रा. होले यांचा मृत्यू झाला. लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी प्रा. होले यांचा खून केल्याची फिर्याद नातेवाईक शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या खुनाला आठ दिवस उलटून गेले तरी अजूनही खुनी कोण? याचा शोध लागलेला नाही. कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान मारेकर्‍यांचा शोध लागत नसल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले होते. अजूनही मारेकरी सापडलेले नाही. एलसीबी पथकाकडून त्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. लुटीच्या वेळी झालेल्या झटापटीत प्रा. होले यांचा खून झाला आहे. यामागे आणखी काही वेगळे कारण असू शकते का? याची पडताळणीही पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान लूट करतेवेळी प्रा. होले यांनी केलेला विरोध न जुमानता लुटारूंनी त्यांना गोळ्या घालून मारले असावे, अशीच एक शक्यता तपासातून पुढे येत आहे. त्यादृष्टीने तपास करण्यावर एलसीबीने भर दिला आहे.ही लुटारूंची टोळी बाहेरील जिल्ह्यातील असण्याची शक्यता असून पोलीस लवकरच त्यांना अटक करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिक्षकांचे एसपींना निवेदन

प्रा. शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरूवारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सचिव बाबासाहेब शिंदे, दीपक जाधव, भाऊराव नाडेकर, रमाकांत दरेकर, अवधुत आहेर, सुनील पंडित, रंगनाथ जगधने, देवीदास पालवे, डी.व्ही. शिंदे, ज्ञानदेव बेरड, प्रा. रवींद्र देवढे, एम.एम. कांडेकर, सिताराम जपकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या