Saturday, July 27, 2024
Homeनगरसहा वर्षांपूर्वी वाळू तस्कराकडून घेतलेल्या गावठी कट्ट्यातून झाडली गोळी

सहा वर्षांपूर्वी वाळू तस्कराकडून घेतलेल्या गावठी कट्ट्यातून झाडली गोळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगाराच्या नादाला लागून रस्तालुटीतून झटपट पैसे कमवण्यासाठी निघालेल्या तरूणाने सहा वर्षांपासून स्वत:कडे असलेल्या गावठी कट्ट्याचा वापर करत श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी किसन ऊर्फ देवा होले यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.

- Advertisement -

सराईत गुन्हेगार अजय भाऊसाहेब चव्हाण (वय 25), सागर वसंत जाधव (वय 26, दोघे रा. वळणपिंप्री ता. राहुरी) राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय 27 रा. खेडले परमानंद ता. नेवासा) अशी अटक केलेल्या तरूणांची नावे आहेत. त्यांनी साकुर पेट्रोल पंपावरील दरोड्यासह घारगाव शिवारातील दुकानदाराला लुटल्याची कबूली दिली आहे. अजय हा सराईत गुन्हेगार आहे. तो यापूर्वी सोनई येथील एका गुन्ह्यात शिक्षा भोगून आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो बाहेर आला होता. त्याच्यावर पुणे, औरंगाबादसह नगर जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याची गाठ सागर जाधव व राजेंद्र शिंदेसोबत झाली.

राजेंद्र हा वळणपिंप्री शिवारात शेती करतो. रस्तालुटीतून कमी वेळात पैसे मिळतात. शिवाय रात्रीच्यावेळी कोणी पाहतही नाही. मला जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढे तुम्हाला मी जास्त पैसे देईल, असे अजयने सागर व राजेंद्रला सांगितले. राजेंद्रकडे गेल्या सहा वर्षांपासून एक गावठी कट्टा होता. त्याने तो कट्टा कुख्यात वाळू तस्कराकडून घेतला होता. त्या वाळू तस्कराचा काही वर्षांपूर्वी इमामपूर घाटात (पांढरीपुल) गोळ्या घालून खून झाला आहे.

दरम्यान त्याचा राजेंद्र शिंदे चाहता होता. त्यावेळीच त्याने हा गावठी कट्टा घेतला होता. गेल्या सहा वर्षांपासून त्याच्याकडे पडून असलेल्या गावठी कट्ट्याचा वापर त्याने अजय व सागर बरोबर रस्तालुटीसाठी करण्याचे ठरवले होते. धमकवण्यासाठी गावठी कट्टा वापरून रस्तालुट करत पैसे कमवायचे व त्यातून चंगळ करायची असा त्यांचा ‘प्लॅन’ ठरला होता. त्यासाठी पुणे येथून चोरलेली दुचाकी अजयने आणली होती.

रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर एकट्यादुकट्याला पाहून लूटमार करण्यास त्यांनी सुरूवात केली. 23 फेब्रुवारी रोजी रात्री नेप्ती जवळ केडगाव बायपासला रस्त्याच्या कडेला अंधारात बसलेल्या प्रा. शिवाजी होले व त्यांचा मित्र अरूण शिंदे (दोघे रा. नेप्ती) यांना पाहिल्यावर चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही नेप्तीचे आहोत, आम्हाला नडता काय… असे म्हणत प्रा. होले पळायला लागले आणि त्याच वेळी अजय म्हणाला… वो शोर मचायेगा, मार उसको गोली…आणि लगेच राजेंद्रने प्रा. होले यांच्या दिशेने गोळी झाडली, त्यांच्या कानामागील डोक्याच्या भागास ती लागली आणि त्यांचा जीव गेला.

23 फेब्रुवारीला केडगाव बायपास येथील रस्ता लूट व खुनाच्या गुन्ह्यानंतर अजय, सागर व राजेंद्र या तिघांनी आणखी दोन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात 26 फेब्रुवारीला रात्री पुणे-नाशिक रोडवरील लक्ष्मी टायर पंक्चर दुकानात चाकूचा धाक दाखवून 34 हजार 500 रूपये, दुचाकी व मोबाईल पळवला. त्यानंतर यातिघांनी साकुर-मांडवा रस्त्यावरील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे असलेल्या भगवान भगवान पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरले, त्यावेळी तेथे दोन कर्मचारी असल्याचे पाहून आणि त्यापैकी एक जण केबिनमध्ये पैसे मोजत असल्याचे पाहून त्या दोघांना गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पावणे तीन लाखाची रक्कम लुटली.

एलसीबीच्या तपासात हे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत व त्यांनी असे गुन्हे आणखी कोठे केले काय, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले. दरम्यान, यातिघांव्यतिरिक्त त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत काय व या तिघांनी आणखी काही गुन्हे केले आहेत काय, याचाही शोध पोलीस घेत आहे. हे तिन्ही आरोपी व्यसनांध आहेत. दारू व गांजाचे व्यसन त्यांना आहे. रस्ता लुटीच्या पैशांतून व्यसन व मौजमजा, मोबाईल त्यांंनी घेतले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

सीसीटीव्ही आणि खबरे आले कामाला

पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, महिला अंमलदार भाग्यश्री भिटे, चालक अंमलदार उमाकांत गावडे व संभाजी कोतकर, भरत बुधवंत या विशेष पथकाने राहुरी, संगमनेर व पुणे या महामार्गांवरील दुकाने, लॉज, धाबे व पेट्रोल पंपांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासणीत तिन्ही आरोपी दिसत होते व राहुरी परिसरात त्यांचे लोकेशन सापडल्याने या परिसरातील सराईत व पसार गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यासाठी पोलिसांना त्यांच्या खबर्‍यांचे नेटवर्क कामाला आले. तातडीने वळण पिंप्रीला जाऊन संशयित अजय चव्हाणला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर दोन साथीदारांसह केडगाव बायपास येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून व एकाचा खून केल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शेतात पाणी भरत असलेल्या राजेंद्रला ताब्यात घेतले. त्यानंतर सागर जाधवला ताब्यात घेतले. या तिघांची पुन्हा सखोल चौकशी केल्यावर त्यांनी प्रा. होलेे यांच्यावर लुटीच्या उद्देशातून गोळीबार केल्याची तसेच संगमनेर, घारगाव येथील गुन्ह्याची कबूली दिली.

‘या’ पोलिसांना बक्षीस

प्रा. शिवाजी होले यांच्या खून प्रकरणातील गुन्हेगारांचा सखोल तपास करून शोध घेण्यात यश मिळवल्याने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला 20 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, डी. एन. शिंदे, विशाल दळवी, रोहित येमुल, सागर ससाणे, मयूर गायकवाड, महिला अंमलदार भाग्यश्री भिटे हे या बक्षीसाला पात्र ठरले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या