Thursday, June 18, 2026
Homeक्राईमCrime News : व्यावसायिकावर हल्ला करत हवेत गोळीबार

Crime News : व्यावसायिकावर हल्ला करत हवेत गोळीबार

धारदार शस्त्राने केले वार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी (24 मे) सकाळी एका व्यावसायिकावर चार अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात व्यावसायिक चिरंजीव गाढवे (वय 31, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांनी पळून जाताना हवेत गोळीबार केल्याचे गाढवे यांचे म्हणणे असून पोलिसांना घटनास्थळी निकामी काडतूस आढळून आली आहे.

- Advertisement -

याबाबत गाढवे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गाढवे यांची एमआयडीसी निंबळक बायपास परिसरात मनोहर इंजिनियरिंग नावाची कंपनी आहे. ते आपल्या मित्रासोबत रविवारी सकाळी चहा-नाश्त्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास गाढवे व त्यांचे मित्र राजू काळे हे पाईपलाईन रस्त्यावरील तुळजा भवानी मंदिराशेजारी असलेल्या पुणेरी चहा या दुकानात गेले होते. गाढवे हे पाणी बाटली घेण्यासाठी काउंटरजवळ उभे असताना अचानक त्यांच्या पाठीमागून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने गाढवे यांच्या पाठीवर वार केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गाढवे घाबरून दुकानाच्या आतमध्ये पळाले. त्यानंतर सर्व हल्लेखोर दुकानात घुसले. त्यांच्या चेहर्‍यावर मास्क बांधलेले होते. हल्लेखोरांनी तु आमच्या पप्पू शेठचं, गौरव भाऊचं नाव गुन्ह्यात घेतो का? असे म्हणत धारदार शस्त्रे, लोखंडी वस्तू तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी गाढवे यांनी हॉटेलमधील टेबल संशयितांकडे फेकल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गाढवे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा होऊ लागले. त्यामुळे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पळताना त्यातील एका संशयिताने कमरेतील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला असल्याचेही जबाबात नमदू आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, निरीक्षक जगदीश भांबळ यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी निकामी झालेले काडतुस आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. निरीक्षक भांबळ अधिक तपास करीत आहेत.

गेल्या आठवड्यातही हल्ल्याचा प्रयत्न
दरम्यान, गाढवे यांनी शुक्रवारी (22 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर 17 मे रोजी सायंकाळी पाईपलाइन रस्त्यावरील डी-मार्ट परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी यापूर्वी योगेश गलांडे व दत्ता तपकिरे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर योगेश गलांडेचा सहकारी असलेल्या गौरव पाटोळे याच्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण झाला होता, या रागातून गौरव पाटोळे व इतरांनी हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. यानंतर पुन्हा आठ दिवसांनी हल्ला झाला आहे. एमआयडीसीतील दोन गटांतील संघर्ष टोकाला गेल्याचे यातून दिसून येते.

ताज्या बातम्या

Shivsena UBT Crisis : संजय जाधव फुटीर खासदारांचे ‘बॉस’; परभणीत दाखल...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या...