अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार उपनगरातील एम. जी. रस्त्यावरील दत्त बेकरीसमोर लावलेल्या दुकानाच्या फलकावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून बेकरी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी बेकरी चालक दिनेश भाऊसाहेब कराळे (वय 31, रा. सावतानगर, भिंगार) यांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शिवनारायण भिडोरिया, गणेश शिवनारायण भिडोरिया आणि शिवनारायण भिडोरिया (तिघे रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
रविवारी (23 मार्च) दुपारी 1:45 च्या सुमारास दत्त बेकरी, एम. जी. रस्ता, भिंगार येथे ही घटना घडली. फिर्यादी कराळे यांच्या बेकरीच्या समोर संशयित आरोपींनी त्यांच्या दुकानाचा फलक लावला होता. त्यामुळे ग्राहकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत असल्याने कराळे यांनी संशयित आरोपींना फलक हलवण्यास सांगितले.यावरून वाद निर्माण झाला. वाद विकोपास गेल्यावर राहुल भिडोरिया याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
कराळे यांनी विरोध करताच गणेश भिडोरिया याने लाकडी दांडक्याने आणि शिवनारायण भिडोरिया याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत कराळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भिंगारमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान कराळे यांनी दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस. एस. शेख करत आहेत.