Saturday, September 12, 2026
HomeनगरCrime News : व्यावसायिकाची 84.53 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Crime News : व्यावसायिकाची 84.53 लाखांची ऑनलाइन फसवणूक

जिओ पेट्रोल पंप डिलरशिपचे आमिष || सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘जिओ’ पेट्रोल पंपाची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून जामखेड येथील कृषी सेवा केंद्र चालकाची तब्बल 84 लाख 53 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी (15 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींनी फेसबुकवरील जाहिरात, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांचे जामखेड येथे कृषी सेवा केंद्र आहे. फिर्यादीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 रोजी फेसबुक पाहत असताना त्यांना जिओ कंपनीच्या पेट्रोल पंप डिलरशिपची जाहिरात दिसली. जाहिरातीतील लिंक उघडून त्यांनी आवश्यक माहिती भरत पाच हजार रूपये भरून नोंदणी केली. त्यानंतर त्यांना नोंदणी पूर्ण झाल्याचा ई-मेल आला. पुढे पॅनकार्ड, आधारकार्ड, नेटवर्थ प्रमाणपत्र, जागेचा उतारा आदी कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी सर्व कागदपत्रे अपलोड केली. यानंतर त्यांना डिलरशिप मंजूर झाल्याचे सांगत मंजूर क्रमांक देण्यात आला. तसेच जागेची पाहणी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी येणार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांनी स्वतःला एस. एन. पांडे म्हणून ओळख करून देणारी व्यक्ती आणि त्याचा एक साथीदार प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर शिंदे इंजिनिअर नावाने ओळख सांगणार्‍या व्यक्तीनेही काम लवकर सुरू होईल, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

दरम्यान, सौरभ अग्रवाल या नावाने संपर्क करणार्‍या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल आणि विविध बँक खात्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रोसेसिंग फी, विविध शुल्क आणि इतर खर्चाच्या नावाखाली पैसे भरण्याची मागणी केली. त्यानुसार फिर्यादीने स्वतःच्या तसेच पत्नी व दोन मुलींच्या बँक खात्यांतून आरटीजीएस, एनईएफटी आणि यूपीआयव्दारे 31 ऑक्टोबर 2025 ते 8 जुलै 2026 या कालावधीत विविध व्यवहारांव्दारे एकूण 84 लाख 53 हजार रूपये संबंधित बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र, त्यानंतर पेट्रोल पंपाचे काम सुरू करण्याबाबत संपर्क साधला असता संशयित आरोपींनी फोन उचलणे बंद केले.

जागेवर येण्याचे वारंवार आश्वासन देऊनही कोणीही आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. डिलरशिप मिळेल या आशेने काही काळ तक्रार दाखल न करता वाट पाहिल्यानंतर, 14 जुलै 2026 रोजी फिर्यादीने राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...