Friday, November 22, 2024
Homeनगरशिर्डीतील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

शिर्डीतील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

यावसायिकांचे कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थाने एम्प्लॉईज सोसायटीला दर्शन रांगेत नोवेल्टीज, पिण्याचे पाणी बॉटल, पेढे व इतर वस्तू विकण्यास परवानगी दिल्याने शिर्डीतील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून साई संस्थानने स्वतःच्या अधिकारात ना नफा ना तोटा या पद्धतीने दर्शन रांगेत साई भक्तांना विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवाव्यात, अशी मागणी शिर्डीतील व्यावसायिक अमृत गायके व इतर व्यवसायिकांनी कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर याच्याकडे केली आहे.
व्यावसायिकांनी कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, साईबाबा संस्थानने मंदिर परिसरात लाडू प्रसाद व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला परवानगी दिल्यामुळे शिर्डी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

- Advertisement -

साईबाबा संस्थाने एम्प्लॉईज सोसायटीला विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यावर कुठल्याही प्रकारे साईबाबा संस्थानचे नियंत्रण नाही. त्यामुळे दर्शन रांगेत एम्प्लॉईज सोसायटीच्या स्टॉलवर साई भक्तांना किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकल्या जात असल्यामुळे साई भक्तांच्या खिशाला झळ बसते. एम्पलॉइज सोसायटीच्या विक्री स्टॉलवर साईबाबा संस्थान असे नाव असल्याने साई भक्त मनात कुठल्याही प्रकारचा संकोच न करता वस्तूंची खरेदी करतात तसेच मंदिर परिसराच्या बाहेर सुद्धा संस्थानच्या हद्दीत साईनाथ मंगल कार्यालय, द्वारावती धर्मशाळा, 500 रूम तसेच 1000 रूम, बस स्टॅन्ड, साई प्रसादालय या मोक्याच्या ठिकाणी साईबाबा संस्थाने एम्प्लॉईज सोसायटीला साईप्रसाद पेढे, पाणी बॉटल, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, दूध तसेच नोव्हेल्टीचे दुकानांसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

साई भक्तांना मोबाईल व चप्पल ठेवण्यासाठी एम्प्लॉईज सोसायटीकडून लॉकर मागे पाच रुपये आकारणी केली जाते. अमृतसरच्या धरतीवर साईबाबा संस्थानने चप्पल व मोबाईल लॉकर शिर्डीत येणार्‍या साई भक्तांना मोफत देणे गरजेचे आहे. तसेच दर्शन रांगेत व साईबाबा संस्थान जागेत विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी संस्थान प्रशासनाने ना नफा ना तोटा या पद्धतीने वस्तूंची विक्री करावी किंवा एम्प्लॉईज सोसायटी प्रमाणेच शिर्डी सोसायटी, शिर्डीतील विविध सहकारी संस्था, बचत गट किंवा सामाजिक संस्था यांना याठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यवसायिकांच्यावतीने विजय जगताप, दिनेश गुजर, अमोल कोते, नानासाहेब भुसारे, प्रसाद शेळके, स्वराज त्रिभुवन, विकास बोरसे, अ‍ॅड.अविनाश शेजवळ, धनसिंग पाटील, चंद्रभान पवार, साईनाथ गायके, सुधीर चौधरी, प्रणव पाटील आदी व्यावसायिकांनी केली आहे.

साईबाबा संस्थान एम्प्लॉइज सोसायटीवर सत्यता न पडताळता बिनबुडाचे आरोप केल्यामुळे राज्यभरात नावलौकिक असलेल्या संस्थेची बदनामी होत आहे. 1957 साली स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थान परिसरात साई भक्तांच्या  सेवेसाठी व कामगार हितासाठी अतिशय पारदर्शी पद्धतीने संस्थेचा कारभार सुरू ठेवला आहे. प्रत्येक स्टॉलवर ठळक अक्षरात विक्री दर लावण्यात आले असून साई भक्तांना रास्तदरात प्रसाद व इतर साहित्य मिळावे असा संस्थेचा प्रयत्न असतो. मात्र तरीही कोणा साई भक्ताची तक्रार असल्यास किंवा या आरोपांमध्ये तथ्य असल्यास तसे पुरावे संबंधितांनी द्यावे. संस्था कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र अनेक वर्षांपासून संस्था साईभक्त आणि कर्मचार्‍यांच्या हितासाठी कार्यरत असताना काहींना अचानक साक्षात्कार  झाला असून सत्तांतर  होवून  केवळ, पाच महिने झाले आहे. यापूर्वी या संस्थेच्या व्यवसायामुळे व्यावसायिक व नागरिकांवर उपासमारी वेळ नव्हती का? अचानक आत्ताच साक्षात्कार कसा झाला? हे सर्वांना माहीत आहे. यामागे मोठे गौडबंगाल असून फोडाफोडी, लुडबूड व राजकारण सुरू आहे. मात्र सत्य लवकरच समोर येईल तोपर्यंत श्रद्धा व सबुरी ठेवा.
- विठ्ठल पवार, चेअरमन एम्प्लॉईज सोसायटी
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या