Monday, May 27, 2024
Homeनगरसावेडीतील प्रोफेसर चौकात पुन्हा अतिक्रमण

सावेडीतील प्रोफेसर चौकात पुन्हा अतिक्रमण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याभोवती सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा चौक अतिक्रमण मुक्तच करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी स्वतः पाहणी करून अतिक्रमणे हटविली होती. मात्र, जिल्ह्याबाहेरून होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई गुंडाळण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या गाड्यांनी पुन्हा चौक वेढला गेला आहे.

- Advertisement -

प्रोफेसर कॉलनी चौकातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश आयुक्त डॉ. जावळे यांनी दिले होते. त्यानंतर तीन दिवस चौक पूर्णपणे मोकळा होता. मात्र, पुन्हा या जागेवर अतिक्रमणे पूर्वपदावर आली. कापड बाजारातील अतिक्रमणांचा हवाला देत या कारवाईला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही मनपा आयुक्तांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमण काढणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार असल्याने ही जागा रिकामीच करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

मात्र, सदरची अतिक्रमणे हटवू नयेत, यासाठी जिल्ह्याबाहेरील एका मोठ्या राजकीय नेत्याने हस्तक्षेप करून महापालिकेवर दबाव आणला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रोफेसर चौकाला अतिक्रमणाने पुन्हा वेढले आहे. दरम्यान, कारवाई होत नसली तरी मनपा आयुक्त अतिक्रमणे हटविण्यावर ठाम आहेत. मनपाने कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला असून, बंदोबस्त मिळताच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या