Thursday, February 5, 2026
Homeक्राईमCrime News : प्राध्यापकाचे बंद घर फोडून 2.20 लाखांचा ऐवज लंपास

Crime News : प्राध्यापकाचे बंद घर फोडून 2.20 लाखांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात एका प्राध्यापकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान घडली असून, अज्ञात चोरट्यांविरूध्द 7 जुलै रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी प्रा. अविनाश मच्छिंद्र हंडाळ (वय 36, रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, अहिल्यानगर, मुळ रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची पत्नी स्वाती या अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नीची प्रसूती झाल्यामुळे त्या गेल्या काही महिन्यांपासून मूळ गावी भातकुडगाव येथे राहात आहेत, त्यामुळे हंडाळ हे सध्या एकटेच राहत होते. 4 जुलै रोजी सायंकाळी हंडाळ हे आपल्या आजारी मुलाच्या कारणास्तव भातकुडगाव येथे आपल्या मूळ घरी गेले होते. यावेळी त्यांनी घर व्यवस्थित लॉक केले होते.

YouTube video player

मात्र, 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता शेजारी राहणार्‍या अंकुश बेरड यांनी त्यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ गावाहून परत येऊन घरी पाहणी केली असता, दरवाजाचे कुलूप तोडलेले होते आणि घरात उचकापाचक झालेली होती. चोरट्यांनी घरातील बेडमध्ये ठेवलेल्या कपाटातून 1 लाख 60 हजाराची रोख रक्कम, 10 ग्रॅम वजनाची वेल व डुल आणि 5 ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 2 लाख 20 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची फिर्यादीत नोंद आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...