अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्राध्यापकावर पहाटेच्या वेळी तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना मंगळवारी (6 मे) पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ घडली. निखील विकास बोरकर (वय 34 रा. वैशालीनगर, वाघापूर, यवतमाळ, हल्ली रा. आयकॉन पब्लिक स्कूल जवळ, अहिल्यानगर) असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून बुधवारी (7 मे) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरकर हे फुलसिंगनाईक महाविद्यालय, पुसद (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या पत्नी राज्य उत्पादन शुल्कच्या अहिल्यानगर कार्यालयात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रा. बोरकर आपल्या पत्नी व मुलीसह अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत असल्याने ते मोकळ्या हवेसाठी फिरायला बाहेर गेले होते. ते हॉटेल उदयनराजे परिसरातून परत येत असताना रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ एक काळ्या रंगाची दुचाकी अचानक त्यांच्या समोर आडवी लावून तीन अनोळखी युवकांनी त्यांना थांबवले.
तिघांच्या चेहर्यावर रूमाल बांधलेले होते. त्यांनी प्रा. बोरकर यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बोरकर यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केला असता दोघांनी चाकूने त्यांच्यावर वार केले. यात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत आरडाओरडा केल्यामुळे संशयित तिथून पळून गेले. बोरकर यांनी तत्काळ घरी परत जाऊन पत्नीच्या मदतीने रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.