Sunday, May 19, 2024
Homeनगरपाणीप्रश्न सोडवण्यासोबत औद्योगिकरणाला चालना

पाणीप्रश्न सोडवण्यासोबत औद्योगिकरणाला चालना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून पाहिलेले स्वप्न, तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या प्रकल्पाची सुरुवात युती सरकारच्या काळात झाली. हे काम येत्या पाच वर्षात पूर्ण करून नगर जिल्ह्यात आणखी औद्योगिक प्रकल्प आणून औद्योगिकरणाला चालना देण्यात येईल. नगरची वाटचाल आधुनिक शहर म्हणून करण्यास प्रयत्न केला जाईल. कुकडी आणि साकळाई योजना पूर्ण करून दुष्काळी भाग जलमय केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

- Advertisement -

महायुतीचे नगरचे उमेदवार डॉ. विखे पाटील व शिर्डीचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाविजय संकल्प सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार डॉ. सुजय विखे व सदाशिव लोखंडे तसेच जिल्ह्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, 2014 व 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या याच मैदानावर झालेल्या सभांच्या गर्दीचे रेकॉर्ड आजच्या सभेने मोडले आहे, असे आवर्जून सांगून फडणवीस म्हणाले, नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर केले आहे व ते आता मोदींच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात येईल.

मोदींच्या जादूमुळे माझ्या जन्माच्या आधीपासून सुरू झालेला निळवंडे प्रकल्प मोदींमुळेच पूर्ण झाला आहे. चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग नगरला जोडले आहेत, चार एमआयडीसी होत आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकडी व साकळाई पाणी योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने आता प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच पश्चिम वाहिनीचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोर्‍याचा नगर-नाशिक, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र परिसर दुष्काळमुक्त करण्याची मागणी केली. शिर्डीचे उमेदवार लोखंडे यांनी घाटमाथ्यावरून वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी अडवून त्यापैकी 25 टीएमसी पाणी नगर जिल्ह्याला देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. नगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात, पण विरोधकांकडून विकासाचे मुद्दे मांडले जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या