Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedमराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना-राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना-राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर –  Chhatrapati Sambhajinagar

केंद्र व राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व क्षेत्रात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेमार्ग, रस्ते, शेती, उद्योग, पाणी, आरोग्य यासह मराठवाड्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य असेल. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

स्वामी रामानंद तिर्थ सभागृहात झालेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आयोजित बैठकीत डॉ. कराड बोलत होते. यावेळी उद्योगपती राम भोगले, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, रश्मीताई बोरीकर, ॲड.जी.आर.देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले, मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य सरकाराकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. जायकवाडी प्रकल्पातून आपल्या महानगरासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने सुरू आहे. याबाबत आपण सातत्याने आढावा घेत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामांना गती देण्यात आली आहे. या कामासाठी भरीव निधी देण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही.

मराठवाड्यातील रेल्वेमार्गाला गती देण्यासोबतच औरंगाबाद व जालना येथे रेल्वे वर्कशॉपचे काम अंतिम टप्प्यात आहे. २४ डब्यांचे हे मोठे वर्कशॉप असून यामुळे रेल्वेसेवेला गती मिळण्यास मदत होणार आहे. वंदे भारत ही रेल्वेसेवाही मराठवाड्यात लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. नगरपर्यंत रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असून हा रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. रेल्वेमार्गासोबतच महानगरात शेंद्रा ते वाळूज मेट्रोमार्गाचे कामही गतीने होणार आहे. विमानसेवा वाढीवर भर देण्यात येत असून भूसंपादनासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. यामुळे विमानसेवेत वाढ होणार असल्याचे डॉ.कराड म्हणाले.

जायकवाडी प्रकल्पावर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार असून दोन हजार मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज देणे सुलभ होणार आहे. महानगरासोबतच वेरुळ-अजिंठा, शहाजीराजे भोसले स्मारक, मालोजीराजे भोसले गढी, घृष्णेश्वर, बीबी-का-मकबरा यासह विविध पर्यटन स्थळांसाठी सीएसआरमधून कामे हाती घेण्यात येत आहेत. मराठवाड्यातील पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोयी सुविधा व परिसराच्या सर्वांगिण विकासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.  

शेतकऱ्यांसाठी अद्ययावत असे प्रशिक्षण केंद्र उभारणी करण्यात येणार असून यासाठी शासनाने हिमायतबाग येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच या प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात येणार आहे. कामगारांसाठी वाळूजमध्ये ५०० व शेंद्रा औद्योगिक वसाहतीत १०० खाटांचे रुग्णालये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच पावसाचा अंदाज देणारे यंत्रही म्हैसमाळ परिसरात बसविण्यात येणार आहे. यातून मराठवाड्यातील बहुतांश भागातील पावसाचा अंदाज समजण्यास मदत होणार आहे.

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे डॉ.कराड यांनी सांगितले. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य व सहभाग असेल, सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले. यावेळी मराठवाड्यातील विविध भागातून आलेल्या स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली.  

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या