अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथील सोनल गार्डन बार रेस्टॉरंट व लॉजींगवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व बेलवंडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोन महिलांची सुटका केली आहे. कुंटणखाना चालविणार्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील गेणा सोनलकर (वय 33, रा. गव्हाणवाडी, ता. पारनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
शिरूर ते अहिल्यानगर रस्त्यावरील बेलवंडी फाटा येथील सोनल गार्डन बार रेस्टॉरंट व लॉजिंग येथे एक व्यक्ती महिलांकडून वेश्या व्यवसाय (कुंटणखाना) करून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी (20 ऑक्टोबर) मिळाली होती. त्यांनी बेलवंडी पोलिसांना सोबत घेत सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला. कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कुंटणखाना चालविणारा निखील गेणा सोनलकर याला ताब्यात घेतले. त्या ठिकाणी दोन महिला मिळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. आमच्याकडून पैशावर वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची कबूली त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, रोहित येमुल, भाग्यश्री भिंटे, ज्योती शिंदे, रणजीत जाधव, भाऊसाहेब शिंदे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.