Friday, September 20, 2024
Homeनगरप्राथमिक आरोग्य केंद्राचे संरक्षण खासगी सुरक्षा रक्षकांच्या हाती!

प्राथमिक आरोग्य केंद्राचे संरक्षण खासगी सुरक्षा रक्षकांच्या हाती!

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

ग्रामीण भागात गावोगावी, खेडोपाडी कार्यरत असणार्‍या आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणात असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षा आता खासगी सुरक्षा रक्षकांच्या हाती सोपवण्यात येणार आहे.

राज्यातील 1 हजार 906 प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्ययंत्रणेद्वारे खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे. यात नगर जिल्ह्यातील 100 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश राहणार आहे. या बाह्ययंत्रणेतील सुरक्षा रक्षकांची नेमणूक ही सरकार पातळीवरून होणार असून त्यानंतर याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला कळवण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत गेल्या काही कालावधीत तिन वेळा शासन निर्णय काढलेले आहेत. आधीच्या दोन शासन निर्णयात करण्यात आलेल्या तरतूदी 1 ऑगस्टला काढण्यात आलेल्या शासन निर्णयात रद्द करण्यात आल्या असून आता राज्य पातळीवर एकत्रित सर्व 1 हजार 906 प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यवतीने काढण्यात आलेल्या पहिल्या शासन निर्णयात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील 34 पैकी नाशिक, रायगड, कोल्हापूर, जळगाव आणि नंदूरबार हे पाच जिल्हे वगळून अन्य ठिकाणी राज्य पातळीवरून बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर पुन्हा हा आदेश रद्द करत राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात हे सुरक्ष नेमण्यात येणार आहेत, त्याचीच माहिती त्यात्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आधी मिळणार नाही. नेमणूक झाल्यानंतर संबंधीत खासगी सुरक्षा रक्षक यांची नेमणूक झाल्याची माहिती देण्यात येणार आहे.

सैनिक मंडळाला प्राधान्य
प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक टोकाचे प्रकार घडत आहे. यासह याठिकाणी वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने घेतले आहेत. यासाठी राज्य पातळीवरून सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या सैनिकांच्या मंडळानूसार प्रधान्यक्रमाने संबंधीत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात येणार आहे.

आठ तास ड्युटी; 16 हजार पगार
सरकार पातळीवरून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात येणार्‍या खासगी सुरक्षा रक्षक यांना महिन्याला 16 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे. यासाठी संबंधीत सुरक्षा रक्षकाला आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. तसेच तीन शिफ्तमध्ये हे सुरक्षा रक्षक काम करणार असल्याचे आरोग्य विभागाच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या