Saturday, June 13, 2026
Homeनगरअनिकेत वडीतके आत्महत्येप्रकरणी 'रास्ता रोको'!

अनिकेत वडीतके आत्महत्येप्रकरणी ‘रास्ता रोको’!

कोल्हार भगवतीपूर (वार्ताहर)

१७ वर्षीय अनिकेत सोमनाथ वडीतके या निष्पाप युवकाच्या आत्महत्येमुळे सकल धनगर समाज संतप्त झाला असून, दोषींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी नगर-मनमाड महामार्गावर तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात आले.

- Advertisement -

गळनिंब येथील टेम्पोचालक अनिकेत वडीतके याला कथित गोरक्षकांनी (स्वयंघोषित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी) कत्तलखान्यात गाय घेऊन जात असल्याच्या केवळ संशयावरून बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर स्टेटस म्हणून प्रसारित केला. सोशल मीडियावर झालेली ही बदनामी अनिकेतच्या जिव्हारी लागली. या अपमानास्पद घटनेमुळे त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अनिकेतच्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कोल्हार येथील चार आरोपींविरुद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. अनिकेतला न्याय मिळवून देण्यासाठी सकल धनगर समाजाने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोल्हार भगवतीपूर येथे नगर-मनमाड महामार्गावर तब्बल अर्धा तास रास्ता रोको करत तीव्र निदर्शने केली.

‘येळकोट येळकोट जय मल्हार!’ च्या घोषणांनी महामार्ग दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी ‘अनिकेत वडीतके यास न्याय मिळालाच पाहिजे!’ आणि ‘दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी!’ अशी आक्रमक मागणी केली. यावेळी आंदोलकांनी शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती व तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही मागणी केली की, त्यांनी मयत अनिकेतच्या कुटुंबीयांना भरीव मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा.

या रास्ता रोको आंदोलनात सकल धनगर समाजाचे दीपक बोराडे, यशवंत सेनाचे जिल्हाप्रमुख विजय तमनर, रा. स. प. चे सरचिटणीस डॉ. सुनील चिंधे, सरपंच शिवाजी शिंदे, पांडुरंग आठरे, दत्तात्रय माळी, संजय कुदनर, ज्ञानेश्वर वडीतके यांच्यासह कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आता पोलीस प्रशासन व राज्य सरकार या प्रकरणात काय कठोर भूमिका घेते, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...