राज्यात पावसाचा हुलकावणीचा खेळ सुरूच आहे. गणेशोत्सवात पावसाने काही वेळा अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्याच आशा काहीशा पल्लवित झाल्या होत्या. तथापि पावसाने त्यावर पाणी फेरायचे ठरवले असावे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून टप्याटप्याने त्याचा परतीचा प्रवास सुरु करणार आहे. राज्याच्या जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के घट असल्याचे व उपयुक्त साठा ७१ टक्के सांगितले जाते.
सर्वांच्या सगळ्या आशा परतीच्या पावसावर केंद्रित झाल्या आहेत. त्याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. राज्यात गेल्या वर्षी या काळात एकही टँकर सुरु नव्हता. यंदा मात्र साडेचारशेपेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु झाले आहेत. पावसाने ओढ दिली तर राज्याच्या अनेक भागावर दुष्काळाचे सावट असण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भूजल पातळी दरवर्षी ७ सेंटीमीटरने कमी होत असल्याचा निष्कर्ष माध्यमात प्रसिद्ध झाला आहे. ‘जर्मनीतील ‘रिजनल एन्व्हायर्न्मेंटल चेंज’ या शोधपत्रिकेत हवामान आणि भूगोल अभ्यासक राहुल तोडमल यांच्या शोधनिबंधात तो नमूद असल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हंटले आहे.
पिकांच्या होरपाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले आहेत. दुष्काळाची शक्यता व्यक्त केली गेली तरी लोक धास्तावतात. पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. लोकही पाणी जपून वापरतात. तथापि हे शहाणपण तात्पुरते ठरते, असे निरीक्षण जाणते नोंदवतात. याआधीही अनेकदा असा अनुभव घेतल्याचे ते सांगतात. एकदा का हंगामी पावसाने सरासरी गाठून आबादी-आबाद झाले की पाण्याची उधळपट्टी सुरु होत असल्याचे निदर्शनास येते. दुष्काळाची कारणे अनेक असली तरी सामान्य लोकांना त्यांच्या पातळीवर उपाय योजता येऊ शकतात. दुष्काळ म्हटले की सामान्यतः पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. ते योग्यही आहे. तथापि पाण्याविषयीची एकूणच समज वाढायला हवी. पृथ्वीवर पाणी मर्यादीत आहे. भविष्यात महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज अधूनमधून व्यक्त होत असतो. त्यांना अशी भीती का वाटते, याचे लोकशिक्षण व्हायला हवे.
पाणीसाठा अनमोल आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध होणे पुरेसे असा समज सामान्यतः आढळतो. स्थानिक स्तरावर धरणांमधील जलसाठ्याचे नियोजन कसे केले जाते, पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम कसा ठरवला जातो हे शालेय पातळीवर समजावून दिले जायला हवे. पाणी ते जपून वापरले नाही तर ते एक दिवस संपणार आहे याची जाणीव खोलवर रुजायला हवी.
ती रुजली तर पाणी साठवण आणि जपून वापरण्यासाठी माणसे स्वयंस्फूर्त पुढाकार घेतील. पाण्याची उधळपट्टी कमी होऊ शकेल. यंदा दुष्काळाची भीती आतापासून व्यक्त होत आहे. लोकांमध्येही त्याची चर्चा सुरु आहे. जाणीवा विकसित करण्याची हीच संधी सरकार, विविध सामाजिक संस्था आणि जाणते साधतील का? लोकांना सुजाण करण्यासाठी पुढाकार घेतील का?