नाशिक | प्रतिनिधी Nashik
‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात समाविष्ट नद्यांसह सर्वच नद्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक तथा ‘चला जाणू या नदीला’ समितीचे सदस्य सचिव सिद्धेश सावर्डेकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचक्के, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, अंबरिश मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात असलेल्या नद्यांबाबतची माहिती प्रत्येकाला व्हावी, नदी संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा, नदी व परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन याबरोबरच जलसंधारण आणि जलसाक्षरता या दोन्ही संकल्पना एकत्रित केल्या आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांच्या संवर्धनाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नदी संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
उपवनसंरक्षक सावर्डेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोती, म्हाळुंगी, वाल, नंदिनी, अगस्ती, कपिला, वरुणा या नदी काठावर नदी संवाद यात्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंडित, मोरे आदींनी नदी संवर्धन याविषयावर मनोगत व्यक्त केले.




