Saturday, July 27, 2024
Homeनगरबांधकाम विभागाने बदलली गावांची नावे घुलेवाडीचे झाले धुलेवाडी

बांधकाम विभागाने बदलली गावांची नावे घुलेवाडीचे झाले धुलेवाडी

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

शासनाच्या राजपत्रात राज्यातील सर्वच गावांची नोंद आहे. गावांची नावे सरकारच्यावतीने निश्चित केलेली आहेत. आता नावे बदलायची म्हटले की त्यासाठी पुन्हा शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, शासनाचे राजपत्र, शासन निर्णय असे बरेच काही सोपस्कार पूर्ण करावे लागतात..तसं म्हटलं तर हे काम फारसे लवकर होण्याची शक्यता नाही..येथे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र स्वतःच अनेक गावांची नावे बदलत दिशादर्शक फलक तयार केले आहेत. आपली राजभाषा मराठी असूनही तिची शुध्दता पाळण्याची जबाबदारी शासनाच्या सर्वच विभागांची आहे मात्र त्यालाही अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने हरताळ फासला आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी हे एक महत्त्वाचे गाव आहे. राजकीयदृष्ट्या ते अधिक संवेदनशील आहे. त्याचवेळी नगर जिल्ह्यातील अधिक आर्थिक उत्पन्न मिळविणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. तेथे संगमनेर शहराशी संबंधित अनेक उद्योग आहेत. त्या गावाकडे जाताना रस्त्यावर काही ठिकाणी घुलेवाडी ऐवजी ‘धुलेवाडी’ असे नामफलक दर्शकावर लिहिण्यात आले आहे. तर संगमनेर तालुक्यातील दुसरे महत्त्वाचे गाव म्हणून मालदाड ओळखले जाते. तेथे कृषी महाविद्यालय आहे. त्या गावाचे नावही दिशादर्शक नामफलकावर मालदंड असे लिहिण्यात आले आहे. तेथे जवळच ‘खांजापूर’ आहे. त्याचे नावही ‘खाजापूर’ असे दर्शित करण्यात आले.

अवघ्या शंभर मिटरच्या आत दोन दिशादर्शक फलक आहेत. तेथील एका फलकावर खांजापूर तर दुसर्‍या फलकावर खाजापूर असे करण्यात आले आहे. एका फलकावर पूरला र्‍हस्व उकार देण्यात आला आहे तर दुसर्‍या नामफलकावर दीर्घ उकार देण्यात आला आहे. त्यामुळे नेमके कोणते नाव बरोबर आहे असा प्रश्न जाणार्‍या येणार्‍या प्रवाशांना पडतो. खरंतर राज्य शासनाने शुध्द लेखनाचे नियम केलेले असताना त्या शासनाच्या विभागालाच जर शासनाच्या नियमाचे घेणे देणे नसेल तर इतरांनी तरी शुध्द लेखनाचे नियम का पाळायचे? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. त्यामुळे किमान गावांची नावे तरी बदलण्याची प्रक्रिया बांधकाम विभागाने करू नये. त्यामुळे बाहेरील एखादा प्रवासी आल्यास त्याचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या