पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातील अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटवर बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात रचलेल्या सापळ्यात या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १६ किलोहून अधिक गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८ लाख ७६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
अभिषेक भिका बोरसे (वय २४) आणि अक्षय भिका बोरसे (वय २९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी चिंचवड येथील साईदत्त रेसिडेन्सीमधील रहिवासी असून, ते शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सारग यांना या व्यवहाराबाबत एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावाजवळ दोन व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार होत्या. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अलका सारग, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास दबेराव आणि गणेश रायकर यांच्या विशेष पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन संशयित काळ्या रंगाच्या होंडा शाईन दुचाकीवरून त्या ठिकाणी पोहोचले.
पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच या दोघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडले. पोलिसांनी त्यांची प्राथमिक झडती घेतली असता, त्यांच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या बॅगेत ३.०३४ किलो गांजा मिळून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांच्या चिंचवड येथील निवासस्थानावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले.
आरोपींच्या घरातून पोलिसांनी १३.०८८ किलो शुद्ध गांजा, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि अमली पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. या संपूर्ण कारवाईत एकूण १६.१२२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





