पुणे । Pune
पुण्यातील नामांकित उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांची बिहारमध्ये गळा दाबून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे यांना कंपनीच्या कामाच्या निमित्ताने आरोपींनी ई-मेलद्वारे पाटण्यात बोलावले होते. स्वस्त दरात मशीनरी व टूल्स उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बिहारमध्ये पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि कुटुंबीयांनी कोथरूड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
शनिवारी, 12 एप्रिल रोजी बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस स्टेशन हद्दीतील माननपूर गावाजवळ एका अज्ञात मृतदेहाचा सापडला होता. प्रथमदर्शनी तो बेवारस मृतदेह असल्याचे समजून पोलिसांनी शवविच्छेदन केले. मात्र, सोमवारी मृतदेहाची ओळख लक्ष्मण शिंदे यांच्यापर्यंत झाली आणि घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. ही घटना पूर्वनियोजित फसवणुकीद्वारे घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.