पुणे | Pune
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. रुपाली चाकणकर यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील संतापजनक घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला. रुपाली चाकणकर यांनी सर्व महिलांना सुरक्षेचा सल्ला दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांना आवाहन करत म्हटले की, ‘तरुण मुली, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये’.
त्या पुढे म्हणाल्या, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसे पाहिले तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असते. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.” माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘तुम्ही यंत्रणांची मदत घ्यावी. स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सतर्क रहावे, असा सल्ला आयोगाने दिला आहे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन आणि तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.
“काल सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातले जातेय. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केले असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, त्यानुसार लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा